Namrata Sambherao: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारी अभिनेत्री नम्रता संभेराव (Namrata Sambherao) ही तिच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. नम्रता साकारत असलेल्या 'लॉली' या भूमिकेनं अनेकांची मनं जिंकली आहेत. नम्रता आणि हास्यजत्रेचा चाहता वर्ग मोठा आहे. नुकत्याच मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नम्रतानं तिच्या एका चाहत्याची आठवण सांगितली.
नम्रतानं सांगितली आठवण
मित्र म्हणे या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये नम्रतानं तिच्या आणि हास्यजत्रेचा एका चाहत्याची आठवण सांगितली. ती म्हणाली, "एक आठ वर्षाचा मुलगा होता. तो आता जगात नाहीये. तो हास्यजत्रेचा खूप मोठा फॅन होता. त्या मुलाच्या कुटुंबातील लोक त्या मुलाला घेऊन पुण्यात आले होते. त्या मुलाला आम्हाला भेटायचं होतं. त्याला कोणता तरी आजार होता. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, हा फार दिवस जगू शकत नाही. तो मुलगा आम्हाला भेटायला आला होता तेव्हा लॉलीची अॅक्टिंग करुन दाखवली. मी त्या मुलाला पाहून भारावून गेले."
पुढे नम्रतानं आणखी एका फॅनबद्दल सांगितलं. ती म्हणाली, "आम्हाला ट्रेनमध्ये एक बाई भेटली होती. ती म्हणाली, माझ्या हृदयाला छिद्र आहे. मी डिप्रेशनमध्ये होते. पण जेव्हा हास्यजत्रा बघायला लागले तेव्हा मी सगळ्या गोष्टी विसरले."
नम्रताच्या वडिलांनी पाहिलेला परफॉर्मन्स
नम्रताच्या वडिलांनी जेव्हा तिचा परफॉर्मन्स पाहिला होता, तेव्हा त्यांनी कशी रिअॅक्शन दिली? याबद्दल देखील नम्रतानं मुलाखतीमध्ये सांगितलं. ती म्हणाली, "मी नववीत होते. तेव्हा मी पहिला परफॉर्मन्स केला होता. तेव्हा अनेकांनी कौतुक केलं. माझ्या वडिलांना सुरुवातीला वाटत होतं की, आपल्या मुलीनं या क्षेत्रात काम करु नये. पण माझ्या आईनं सुरुवातीपासूनच मला सपोर्ट केला. वागणीला एक स्पर्धा होती. तेव्हा स्पर्धेला जाताना मी टीमसोबत गेले पण येताना मला रात्री खूप उशीर होणार होता. म्हणून माझे वडील मला घ्यायला आले होते. तेव्हा माझ्या वडिलांनी मला परफॉर्म करताना पाहिलं होतं. माझ्या वडिलांचे तेव्हा डोळे भरुन आले होते."
नम्रता संभेरावने अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 'एकदा येऊन तर बघा' नम्रताचा आगामी चित्रपट 8 डिसेंबरला रिलीज होत आहे.
संबंधित बातम्या