धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित 'पळशीची पीटी' या आगामी मराठी चित्रपटात राहुल्या उर्फ राहुल मगदूम एका विकास शिंगाडे नामक हवालदाराच्या भूमिकेत दिसणार आहे. ऍथलेट 'भागी'वर आधारलेल्या या चित्रपटात तो या पळशीच्या पीटीवर हवालदिल झालेला दिसणार असून ही पळशीची पीटी दुसरी-तिसरी कुणी नसून ‘जयडी’ उर्फ किरण ढाणे आहे हे विशेष.
EXCLUSIVE : मामी आणि जयडी यांनी 'लागिरं झालं जी' मालिका का सोडली?
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजलेला 'पळशीची पीटी' हा चित्रपट ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेवर भाष्य करणारा असणार आहे. साधारण कुटुंबात जन्मलेली 'भागी' आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा करत, नॅशनल ऍथलेट बनण्याचा मान पटकावते कि नाही ?? ती चित्रपटाची मध्यवर्ती कथा असून त्याअनुषंगानं येणाऱ्या घटनांना जोडणारा राहुलने साकारलेला हवालदार विकास शिंगाडे एक महत्त्वपूर्ण भूमिका वठवताना दिसेल. बघताक्षणी 'भागी'च्या प्रेमात पडणारा विकास शिंगाडे हवालदार तिच्या स्वप्नांना मोकळं आकाश मिळवून देण्यास हातभार लावतो का? राहुल म्हणजेच हवालदार विकास शिंगाडे भागीला आपल्या प्रेमाची कबुली देतो का? या आणि अशा उत्कंठावर्धक प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी 'पळशीची पीटी' असणार आहे.
तरुणांमध्ये प्रचंड प्रसिद्ध असणारा 'राहुल्या' या प्रेमळ दोस्ताला त्याच्या 'पळशीची पीटी' मधील व्यक्तिरेखेविषयी विचारले असता, ''आपल्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. समोरच्याने आपल्यावर विश्वास दाखवत दिलेली नवनवीन कामं हेच मी माझं यश मानतो. दिग्दर्शक धोंडिबा बाळू कारंडे यांनी मला या चित्रपटासाठी विचारताच माझा कॉन्फिडन्स खरंच सांगतो तिपटीने वाढलाय.'' असं हसतच सांगतो.
ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर भाष्य करणारा 'पळशीची पीटी' हा चित्रपट तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मक ऊर्जा देण्याचं काम करतो. मराठी मनोरंजन क्षेत्रात नावावरूनच कुतूहल जागं करणाऱ्या या चित्रपटाची चर्चा सध्या रंगत असून 23 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.