'स्टार विजय' वाहिनीवर सध्या बिग बॉस तमिळचं तिसरं पर्व सुरु आहे. अभिनेत्री वनिता विजयकुमार या पर्वात सहभागी झाल्या आहेत. वनिता यांचे घटस्फोटित पती आनंद राजन यांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिस बिग बॉसच्या दारात येऊन ठेपले होते. कथित अपहरणाच्या प्रकरणात पोलिसांनी वनिता यांची कसून चौकशी केली. मात्र त्यांना घरात ठेवायचं की नाही, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
वनिता या ज्येष्ठ दाक्षिणात्य अभिनेते विजयकुमार आणि दिवंगत अभिनेत्री मंजुळा यांच्या कन्या आहेत. वनिता आणि आनंद राजन यांनी 2012 मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता. त्यांच्या मुलीचा ताबा वडिलांकडे आहे.
दुसरीकडे, अभिजीत बिचुकले यांनी आता जामीनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी अपेक्षित आहे. सात वर्षांपूर्वीच्या एका खंडणी प्रकरणात सातारा सत्र न्यायालयाने बिचुकलेंचा जामीन अर्ज नुकताच फेटाळला आहे.
चेक बाऊन्स प्रकरणी 21 जून रोजी अभिजीत बिचुकले यांना सातारा पोलिसांनी मुंबईतून 'मराठी बिग बॉस'च्या सेटवरुन अटक केली होती. त्यानंतर बिचुकलेंना खंडणीच्या एका जुन्या प्रकरणातही अटक दाखवण्यात आली. बिचुकले हे मुंबईतून परत येण्याची शक्यता कमी असल्यानेच न्यायालायाने जामीन अर्ज फेटाळत त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.