Kusum Serial : ज्ञानेश्वर माऊली मालिकेनंतर सोनी मराठी वाहिनी "कुसुम" ही नवी मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लागिरं झालं जी' या मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केलेली तसेच फारच अल्पावधीत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री झालेली 'शिवानी बावकर' या मालिकेत मुख्य भूमिकेतून दिसणार आहे. शिवानीने 'लागिरं झालं जी' या मालिकेत 'शितली' ही भूमिका साकारली होती. तिच्या या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरात ओळखली जाते.
सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसणार आहे. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लिलया पेलणारी "कुसुम"ची व्यक्तिरेखा असणार आहे. बालाजी टेलिफिल्मस आणि सोनी मराठी वाहिनी या मालिकेची निर्मिती करणार आहेत. आतापर्यंत मालिकेचे तीन प्रोमो आले आहेत. माहेरचं लाईट बील भरणारी, वडिलांना डॉक्टरकडे घेऊन जाणारी आणि सगळ्यांची उत्तम काळजी घेणारी "कुसुम" या प्रोमोमधून प्रेक्षकांना दिसली आहे. दुनियेसाठी खपायचं आणि आई बापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम घरातल्यांची काळजी घेताना दिसून येते आहे.
2001 सालात हिंदीत "कुसुम" नावाच्या मालिकेचे प्रसारण झाले होते. त्या मालिकेचा हा मराठी अवतार आहे. तेव्हा ती मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तसेच या मालिकेने तेव्हा रेकॉर्ड ब्रेकदेखील केला होता. तेव्हाच्या "कुसुम" मालिकेने त्या काळाच्या सामान्य मुलींच्या प्रश्नांना वाचा फोडली होती. पण आता येणारी "कुसुम" मालिका आताच्या काळातील मुली आणि स्त्रियांचं प्रतिनिधित्व करणार आहे. ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे अशा सर्व मुलींसाठी ही मालिका प्रेरणा देणारी ठरणार आहे.
"कुसुम" मालिका आजच्या काळातील मुलींचे प्रश्न मांडणारी आहे. मुलींच्या मनातील प्रश्न "कुसुम" बोलून दाखवणार आहे. त्यामुळे "कुसुम" प्रेक्षकांना त्यांच्या घरातील सदस्य वाटणार आहे. "कुसुम" मालिका उद्यापासून रात्री 8:30 वा. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.