मुंबई : 'कुमकुम' मालिकेतून घराघरात पोहचलेली टीव्ही अभिनेत्री जुही परमार घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. श्रीकृष्णाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला टीव्ही अभिनेता सचिन श्रॉफसोबत तिने आठ वर्षांपूर्वी लग्नगाठ बांधली होती.


टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात सुपरहिट रिअल लाईफ कपल म्हणून जुही-सचिन ओळखले जात होते. मात्र गेल्या वर्षभरापासून दोघांमध्ये वितुष्ट आल्याचं म्हटलं जातं. त्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त 'टाइम्स ऑफ इंडिया'ने दिलं आहे.

2009 मध्ये जुही आणि सचिन विवाहबंधनात अडकले होते. त्यांना समायरा नावाची चार वर्षांची मुलगी आहे. मुलीच्या जन्मामुळे जुहीने ब्रेक घेतला होता. त्यानंतर गेल्या वर्षी 'कर्मफल दाता शनि' या मालिकेतून खलनायिकेच्या भूमिकेतून कमबॅक केलं.

2002 मध्ये स्टार प्लसवर असलेल्या 'कुमकुम- एक प्यारासा बंधन' मालिकेतून जुही प्रसिद्धीच्या शिखरावर गेली होती. सात वर्ष चाललेल्या मालिकेनंतर तिने काही जाहिराती आणि रिअॅलिटी शो केले. बिग बॉसच्या पाचव्या पर्वाची ती विजेती ठरली होती.

जुही आणि सचिन यांची भेट एका टीव्ही शोच्या शूटिंगवेळी झाली. भेटीनंतर पाच महिन्यांत त्यांच्यात प्रेम जुळलं. जयपूरच्या एका महालात दोघांनी शाही विवाह केला.

गेल्या वर्षभरापासून दोघांमधले मतभेद तीव्र झाले आहेत. त्यामुळे मुलीसह जुही सचिनपासून वेगळी राहत आहे. लवकरच दोघं घटस्फोटासाठी अर्ज करणार आहेत. मात्र त्याबाबत दोघांनीही कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.