Kshitish Date On Lokmanya : 'लोकमान्य' (Lokmanya) ही मालिका येत्या 21 डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत लोकमान्य टिळकांच्या (Lokmanya Tilak) भूमिकेत अभिनेता क्षितिज दाते (Kshitish Date) दिसणार आहे. या मालिकेसंदर्भात बोलताना क्षितिज दाते म्हणाला,"लोकमान्य' ही मालिका माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे". 


क्षितिज म्हणाला,"लोकमान्य' ही मालिका लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची चरित्रगाथा आहे. स्वराज्याबद्दल आग्रही असणारे लोकमान्य टिळक महाराष्ट्राच्या मराठी मातीत जन्मलेलं असामान्य व्यक्तीमत्त्व होते आणि आजही त्यांचं स्थान मराठी समाजमनातून अजिबात तसूभरही कमी झालेलं नाही. मी या मालिकेसाठी अभ्यास करतोय, त्यातून मला कळतंय की शाळेत जे शिकवलं गेलं आणि त्यानंतर वाचलं गेलं त्याच्या फार पलीकडचा मोठा अवाका टिळकचरित्राचा आहे. मी या मालिकेचा महत्त्वपूर्ण भाग आहे याचा मला खूप आनंद वाटतो आणि ही मालिका सध्याच्या मराठी मालिकांच्या विश्वात प्रभावी ठरणार आहे".






भूमितेविषयी क्षितिज म्हणाला,"ही व्यक्तिरेखा अतिशय आव्हानात्मक आहे. लोकमान्य टिळकांबद्दल आपल्याला एवढंच माहीत असतं की ते अतिशय कडक आणि शिस्तप्रिय होते. पण त्याशिवाय त्यांचे त्यांच्या पत्नीशी असलेलं नातं कसं होतं, विद्यार्थ्यांशी असलेलं नातं, समाजाच्या विविध स्तरातील लोकांशी असलेलं त्यांचं नातं, त्यांच्या पिढीतले त्यांचे जे आदर्श होते त्यांच्याबरोबरचं त्यांचं नातं, याबद्दल मला नव्याने खूप काही शिकायला मिळालं, त्याबद्दल वाचायला मिळालं. मालिकेच्या निमित्ताने पुन्हा मुळापासून वाचन झालं. ही भूमिका माझ्यातील अभिनयकलेला आव्हान देणारी आहे".


क्षितिज पुढे म्हणाला,"मी गेल्या 10-12 वर्षांपासून नाटक करतोय, सिनेमातदेखील काम केलं आहे. मला असं सतत वाटतं की मी जे काय नवीन काम करतो ते माझ्या जीवनात काय बदल घडवून आणणार आहे, याचं मला फार महत्व वाटतं. आता 'लोकमान्य' या मालिकेने मला आनंद देण्यासोबत जबाबदारीदेखील दिली आहे".


संबंधित बातम्या


Lokmanya : महाराष्ट्रात पुन्हा होणार सिंहगर्जना! टिळकांचा असामान्य प्रवास आता मालिकारुपात; लोकमान्यांच्या भूमिकेत क्षितीज दाते