कोल्हापूर : एखाद्या व्यक्तीला लोकप्रियता मिळाली की तिच्याबद्दल सगळं जाणून घेण्याची आपली इच्छा असते. मग ती व्यक्ती तुमचा आवडता/आवडती हिरो-हिरोईन असेल तर त्यांच्याबद्दल इत्यंभूत माहिती मिळवून स्वत:ला अपडेट ठेवणं जणू काही गरजेचं बनतं.

त्यांचा जन्म कुठचा, त्यांचं शिक्षण किती इथपासून त्यांच्या उंची, आवडीपर्यंत माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटवर सर्च करतात. जिथे शक्य आहे तिथून माहिती मिळवतात. पण इंटरनेटवर मिळणारी सगळीच माहिती खरी असेल असं नाही. इंटरनेटवर अशीच चुकीची माहिती अक्षया देवधरबद्दल उपलब्ध आहे.

'तुझ्यात जीव रंगला'मधल्या पाठकबाई अर्थात अक्षया देवधर 2012 ची मटा श्रावण क्वीन असल्याचा उल्लेख सगळीकडे आहे. परंतु ही माहिती खोटी आणि चुकीची असल्याचं खुद्द अक्षयानेच सांगितलं. कोल्हापुरात 'एबीपी माझा'शी केलेल्या एक्स्लुझिव्ह बातचीतदरम्यान तिने हा खुलासा केला.



ती माहिती चुकीची : अक्षया
तू महाराष्ट्र टाइम्सची 'मटा श्रावण क्वीन' ही स्पर्धा जिंकली आहेस, असं विचारलं असता तिने लगेचच म्हणाली की, "मी मटा श्रावण क्वीन नाही. ती चुकीची माहिती आहे. माझ्याबद्दल हे कोणी छापलं याची मला कल्पना नाही."

अक्षयाचं शिक्षण किती?
'तुझ्यात जीव रंगला'मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या अक्षयाने नुकतंच बिझनेस सायन्समधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. पुण्यातील बीएमसीसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतलं. मालिकेत काम करत असतानाच तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं.



नाटकातील करिअर
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत काम करण्यापूर्वी अक्षयाने अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे. अमेय वाघसोबत 'आयटम' हे नाटक केलं. तर बिनकामाचे संवाद, दर्शन, संगीत मानापमान या नाटकांमधील तिचा परफॉर्मन्स गाजला. 'नाटक कंपनी' या पुण्यातील नाटक ग्रुपसोबत तिने काम केलं आहे.

अक्षया देवधरने सुजय डहाकेच्या 'शाळा' सिनेमातील मुख्य व्यक्तिरेखेपैकी असलेल्या शिरोडकरच्या बहिणीची, अक्काची भूमिकाही साकारली होती.



"नाटकांमध्ये काम करताना अनेक मालिकांसाठी ऑफर्स येत होत्या. पण 'तुझ्यात जीव रंगला' ही मालिका स्वीकारण्यामागे विशेष काही कारण नव्हतं. सगळं आपोआप घडत गेलं," असं अक्षया सांगते.

'तुझ्यात....'ने काय दिलं?  
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेने अक्षयाला नाव, प्रसिद्धी सगळं मिळवून दिलं. "खरंतर विश्वासच बसत नाही की लोक आपल्याला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी एवढे आतुर असतात. त्यांचं हे प्रेम पाहून भारावून जातो. कधी कधी तर स्वत:ला चिमटा काढून हे खरंच घडतंय का हे पाहते," असं अक्षया म्हणते.

...तरीही लोक ओळखतातच
"अंजलीबाई या व्यक्तिरेखेमुळे एवढी प्रसिद्धी मिळाली की, स्कार्फ बांधल्याशिवाय बाहेर पडता येत नाही. पण तरीही लोक ओळखतातच. एक दिवस तोंडाला स्कार्फ बांधून, अॅक्टिव्हावर निघाले अंबाबाई मंदिराकडे, तरीही लोकांनी ओळखलं. अंजलीबाई, पाठकबाई अशा नावाने लोक हात मारत होते," असं तिने सांगितलं.



सेटबाहेर जाणंच कठीण
मालिकेची, त्यातल्या कलाकारांची लोकांमध्ये तुफान क्रेझ आहे. सेटवर अनेक जण भेटायला येतात. शनिवार आणि रविवारी तर इथे अक्षरश: जत्रा भरते. अक्षयाची क्रेझ तर एवढी आहे, की तिला बाहेर पडणंही मुश्कील होतं. अक्षयाने सांगितलं की, "कधी कधी चाहते भेटण्यासाठी येतात तेव्हा मी हार्दिकलाच (राणा) पाठवते, तो बिचारा कोणतीही कटकट न करता त्यांच्याशी भेटतो, बोलतो."

फॅनकडून मिळालेलं अनमोल गिफ्ट


'तुझ्यात जीव रंगला'च्या कलाकारांना पाहण्यासाठी, भेटण्यासाठी चाहते अगदी शेजारच्या गावापासून वेगवेगळ्या जिल्हांमधूनही येतात. काही जण तर एक-दोन दिवस वाट पाहतात. अशाच एका चाहतीबाबत अक्षया सांगते की, "मुंबईहून शेट्टी आडनावाची एक महिला मला भेटण्यासाठी कोल्हापुरातील सेटवर आली होती. ती आमची मालिका न चुकता पाहते. तिला मालिकेतील फक्त मीच आवडते. मलाच पाहण्यासाठी ती ही मालिका पाहते. पहिल्या दिवशी भेट न झाल्याने ती दुसऱ्या दिवशी आली. माझी भेट झाल्याशिवाय ती परत जाणारच नव्हती. अखेर तिला भेटल्यावर तिने मला अंगठी भेट दिली. मी नकार देऊनही आमच्याकडे ही प्रथा असल्याचं सांगून तिने मला ती अंगठी दिलीच. हे अनमोल गिफ्ट मी कधीही विसरणार नाही."

अक्षयाचा जबरदस्त फॅनफॉलोईंग


अक्षयाचा चाहता वर्ग किती मोठा आहे याचा प्रत्यय कोल्हापुरात गेल्यावर येतो. अंबाबाई मंदिराबाहेरील महाद्वार रोड परिसरात शूटिंगदरम्यान तिला पाहण्यासाठी उसळलेली गर्दीच अतिशय बोलकी होती. तिची एक झलक कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी लोक अक्षरश: वेडे झाले होते. चाहत्यांना आवरणं पोलिसांना कठीण झालं होतं. मात्र न वैतागता, न कंटाळता अक्षया चाहत्यांना अभिवादन करत, थँक्यू म्हणत होती. एवढी प्रसिद्धी, लोकप्रियता मिळवूनही अक्षया देवधरचे पाय जमिनीवर आहेत, हेच तिचं यश म्हणावं लागेल.