कोल्हापूर : सच्चे चाहते आवडत्या हिरो-हिरोईनसाठी काहीही करायला तयार असतात. मग कलाकारांचे मोठमोठे पोस्टर बनवणं असो किंवा त्यांच्यासारखा लूक किंवा स्टाईल करणं. आवडत्या कलाकारांच्या नावे फॅन क्लब, व्हॉट्सअॅप ग्रुपही केला जातो. पण यापेक्षा वेगळी पण निरागस आणि गोंडस कोल्हापुरात पाहायला मिळाली. ही फॅन आहे राणा आणि अंजलीबाईंची.

टीआरपीच्या आकड्यांमध्ये टॉप 5 मध्ये असलेल्या 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या लोकप्रियतेचा आलेख चढताच आहे. अवघ्या वर्षभरात मालिकेने, त्यातल्या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. फक्त मोठेच नाही तर लहानग्यांमध्येही तुफान क्रेझ आहे.

अशीच एक चाहती कोल्हापुरात आहे, जिचं वय आहे फक्त सव्वा तीन वर्ष. होय केवळ सव्वा तीन. या चिमुकलीचं नाव आहे मधुरा. ही चिमुकली दररोज घराबाहेर येते, कलाकारांशी हात मिळवते आणि त्यांच्याशी काहीच न बोलता निघून जाते.



कोल्हापुरातील गावात मालिकेचं शूटिंग सुरु आहे. शूटिंग सुरु असताना कलाकारांच्या गाड्या मधुराच्या घराबाहेर पार्क केलेल्या असतात. पॅकअप झाल्यानंतर मधुराला बाय केल्याशिवाय कलाकार जात नाहीत.

कलाकार जेव्हा घरी परतण्यासाठी निघाले की मधुरा घराबाहेर येते आणि राणा, अंजली, सन्नी दा, वहिनीसाहेब यांच्यासह सगळ्यांनाच नित्यनियमाने शेकहॅण्ड करते. शेकहॅण्ड करण्याचा हा शिरस्ता अगदी वर्षभर सुरु आहे.

मधुरा शेकहॅण्ड करायला विसरली, असा एक दिवसही गेला नाही. ज्या दिवशी मोठे घरी नसले तरी मधुरा एकटी घराबाहेर पडते आणि त्यांना शेकहॅण्ड करतेच.

फक्त शेकहॅण्डच नाही, मधुराला सन्नी दा, वहिनीसाहेब, राणा दा यांचे डायलॉग अगदी तोंडपाठ आहेत. त्यामुळे एखादा दिवस जर मधुरा दिसली नाही तर कलाकारांना चुकल्यासारखं वाटतं.