Kiran Mane: अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे काही दिवसांपासून किरण माने हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी साताऱ्यातील शेंगदाणा विक्रेते सतीशरावांचे कौतुक केले आहेत.
"राजवाड्यावरनं तुला सतीश शेंगदानावाल्याकडचे शेंगदाने आनून दिन." आसं म्हणलं की, लहानपणी मी कितीबी रडून धिंगाणा घातला असला तरी गप बसायचो. दादांना माझं हे गुपित नीट म्हायती होतं. कारण अख्ख्या सातार्यागत त्यांनाबी या शेंगदान्यांची भुरळ पडली होती! जगात भारी चव. त्यावेळी मी चारपाच वर्षांचा असेन, आज त्रेपन्न वर्षांचा हाय. आजबी आमची तिसरी पिढी, माझा पोरगा आरूष, राजवाड्यावर गेल्यावर सतीशरावांचे शेंगदाने खाल्ल्याशिवाय परत येत नाय. हे माझंच नाय, समस्त सातारकरांच्या पिढ्या-पिढ्यांचं 'व्यसन' हाय!"
"मी 'बिग बॉस'मध्ये एकदोनवेळा म्हन्लो होतो की, यार, राजवाड्यावरचे शेंगदाने मी मिस करतोय." ते बघून सतीशरावांचं मन इतकं भरून आलं की त्यांनी जाहीर केलं "आमचा सातारचा बच्चन किरण माने आन् त्याच्या परीवारासाठी सतीश शेंगदानेवाल्याकडचे शेंगदाने फ्री मिळणार! काल लै दिवसांच्या गॅपनंतर सतीशरावांना भेटलो. "ऐSSSS किरSन आरं य्ये भावा." करत मिठीच मारली त्यांनी. मला म्हणले एक जानेवारीला "माझ्या व्यवसायाला पन्नास वर्ष पूर्ण होनारंयत. या व्यवसायानं मला सगळं ऐश्वर्य दिलं. पैसा, बंगला, गाडी भरभराट झाली. सहा शाखा जोरात सुरू हायेत आजबी. त्याची परतफेड म्हनून येत्या एक जानेवारीला सकाळी दहा ते रात्री दहा सगळ्या सातारकरांना माझ्याकडचे स्पेशल एक नंबर शेंगदाने, महाबळेश्वरी फुटाने, डाळ, गुळ शेंगदाणा चिक्की, कडक वाटाणा, सोयाबीन, सुर्यफूलाची बी... काय पायजे ते, आन् कितीबी मी फ्री देनार ! त्या सुवर्णमहोत्सवी दिवसाचं उद्घाटन आमचा किरण माने करनार. तू पायजेच मला. शुटिंग बिटींगची कारनं मला सांगायची नाहीत." मला भरून आलं."
"शून्यातून विश्व निर्माण करणारी कष्टाळू माणसं पाहिली की त्या माणसात माझा आज्जा नाना दिसतो ! माझा आज्जा शेतमजूर होता, नंतर मुंबईत मिलमध्ये हमालीबी केली. आमचे सतीश रावखंडे शेंगदानेवालेबी वखारीत हमाल होते. हातावर पोट. एक दिवस ती वखार जळली. हातचं काम गेलं. संसार कसा चालवायचा? हमाली करताना दहा पैसे, चार आने, आठ आने असे पैसे साठवून बावीस रूपये जमा झालेवते. त्यात शेंगदान्याचा व्यवसाय सुरू करूया असं डोक्यात आलं. मिठाचं प्रमाण आणि भाजन्याची पद्धत हीच युनिक आन् सिक्रेट रेसीपी. बघता-बघता व्यवसाय नांवारूपाला आला. आज एवढं वय आनि पैशापान्यानं भक्कम होऊनबी सतीशराव आजबी राजवाड्यावरच्या स्टॉललवर उभे राहुन सेवा देत असत्यात. सतीशराव तुमच्या कष्टाळू आणि दिलदार वृत्तीला कडकडीत सलाम ! लब्यू"
इतर महत्वाच्या बातम्या: