Kiran Mane: किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावर पोस्टमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. किरण माने हे विविध विषयांवर आधारित असणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतीच किरण माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
किरण माने यांची पोस्ट
किरण माने यांनी फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं, 'बौद्ध धर्म, इस्लाम आणि वारकरी संप्रदाय यांची 'भावकी' एकच हाय, असं म्हटलं तर लै जनांना चारशे चाळीसचा करंट लागेल काय-काय जन तर चवताळून उठतील. अंगावर धावून येतील. कारण गौतम बुद्ध, मोहम्मद पैगंबर, संत नामदेव-तुकाराम यांच्या अनुयायांनी आजकाल एकमेकांत भिंती उभ्या केल्यात. काहीजणांनी तर एकमेकांशी उभा दावा मांडलाय.पण या महामानवांचे 'खरे' विचार जर विवेकबुद्धीनं तपासले तर हे तिघांचाबी वैचारीक 'डीएनए' एकच निघतो!' पैगंबरसाहेबांनी त्याकाळात इस्लामची पुरोहितवादातनं, वर्चस्ववादातनं धर्माची सुटका केली. तेच काम इथं गौतम बुद्धांनी केलं. तेच नंतरच्या काळात वारकरी संप्रदायानं केलं. तिघांचाबी पाया एकाच त्रिसुत्रीवर - स्वातंत्र्य,समता आणि बंधुता! पैगंबरांनी कर्मकांड नाकारले. इस्लामनुसार ईश्वरासाठी साधी उदबत्तीबी लावायची गरज नाही. तसंच वारकरी संप्रदायानं नामजपाला महत्त्व देत रोजच्या व्यवहारात देव शोधायला सांगितला.'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी! बुद्धांनी तर कर्मकांड औषधालाबी शिल्लक ठेवलं नाय.पैगंबरांनी एकेश्वरवाद सांगितला.म्हणाले,'ईश्वर एक आहे. त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्याही दलालाची गरज नाही'. जे महात्मा फुलेंनीही सांगितले, "सर्वसाक्षी जगत्पती,त्याला नकोच मध्यस्थी' संत तुकोबारायांनी तर आधीच ठणकावलंय, "एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम । आणिकांचे काम नाही आता ।।" याला म्हणतात वैचारिक भावकी.'
'आता मी एक जगात भारी उदाहरण देतो. तिघांचंबी मेन टारगेट होतं ते 'समता! जातींची उतरंड नष्ट करून, हीन समजल्या गेलेल्या समाजाचा उद्धार करणं. याचं या तिघांतलं हे साम्य लैच नादखुळा हाय. गौतम बुद्धांनी सुनित नावाच्या मैला सफाई करणार्या कामगाराला बौद्ध धर्मात सामावुन घेऊन थेट 'उपसंपदा' दिली. मानाचं स्थान. तसंच, संत नामदेव महाराजांनी शुद्र मानल्या गेलेल्या चोखा महाराला किर्तनाचा मान देऊन संतपदाचा मान दिला. तर पैगंबरांनी गुलाम मानल्या गेलेल्या हजरत बिलालला मशिदीत प्रवेश देऊन जगातली पहिली 'अजान' द्यायला लावली !अजून काय पायजे? सगळ्यांनी 'प्रेम'च शिकवलंय वो. नफरतीला थारा नाय. मनात नफरत पाळणं हा धर्मद्रोह ! निदा फाजली म्हणून गेलाय, "चाहे गीता बांचिये, या पढिये कुरान...'मेरा तेरा प्यार' ही, हर पुस्तक का ग्यान!' असंही किरण माने यांनी पोस्टमध्ये लिहिलं.
इतर महत्वाच्या बातम्या: