Kedar Shinde : बिग बॉसचा पाचवा सीझन (Bigg Boss Marathi New Season) आता अवघ्या काही तासांतच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. पहिले चार सीझन 100 दिवसांचा हा खेळ रंगला होता. त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी पाचव्या सीझनची घोषणा झाली. त्यामुळे या सीझनसाठी प्रेक्षकही उत्सुक झाले होते. पाचव्या सीझनच्या सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना बरीच सरप्राईजेस मिळत गेली. त्यातलं मोठं सरप्राईज होतं, होस्ट म्हणून रितेश देशमुखची एन्ट्री. त्यानंतर या सीझनमधील टास्क त्यातले ट्विस्ट याचीही बरीच चर्चा रंगली. पण काहीच दिवसांपूर्वी हा खेळ 100 ऐवजी 70 दिवसांतच आटोपता घेणार असल्याची माहिती समोर आली.
दरम्यान ही घोषणा झाल्यानंतर बिग बॉस प्रेमींमध्ये निराशा पसरली. हिंदी बिग बॉसमुळे मराठी बिग बॉस लवकर संपवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही म्हटलं जात होतं. पण यामागचं खरं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीये. पण यावर कलर्स मराठीचे चॅनल हेड केदार शिंदे यांचीही प्रतिक्रिया समोर आलेली आहे. केदार शिंदे यांनी नुकतीच मुंबई टाईम्सला मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी यावर भाष्य केलं आहे.
केदार शिंदेंची प्रतिक्रिया
यंदाच्या बिग बॉसच्या सीझनचा टीआरपीही उत्तम असून हा खेळ 70 दिवसांतच संपत आहे, यावर केदार शिंदे यांनी म्हटलं की, 'व्यवस्थापकीय पातळीवर काही निर्णय घेतले जातात. त्या निर्णयांचं पालन करणं हे आमचं काम असतं. त्यामुळे ‘कधी बंद करताय’ यापेक्षा ‘का बंद करताय’ हे विचारलं तर त्यात त्या कार्यक्रमाचं यश आहे.'
'...तुम्हाला वाटतं तसा शो चालू शकत नाही'
केदार शिंदे यांनी या मुलाखतीमध्ये ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, 'ट्रोलर्सना चेहरा नसतो. काही लोकांना ते आवडतं तर काही लोकांना ते आवडत नाही. पण ट्रोल करणाऱ्यांना कळायला हवं की, तुम्हाला वाटतं त्याप्रकारे कार्यक्रम चालू शकत नाही. त्याचप्रमाणे तो आमच्या म्हणण्यांनुसारही चालत नाही. घरात जे स्पर्धक असतात, त्यांच्यानुसार तो कार्यक्रम चालतो. तो त्यांचा गेम असतो, आमचा नाही. त्यामुळे शांत राहून या सगळ्यावर प्रतिक्रिया न देणं मला जास्त महत्त्वाचं वाटतं. रितेशवर झालेलं ट्रोलिंग त्यानं ज्याप्रकारे हाताळलं ते कौतुकास्पद आहे. प्रत्येकाची स्टाइल वेगळी असते. क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर एखादा सामना चांगला खेळले नाहीत; तेव्हा तेही ट्रोल झालेच होते. पण ते उत्तमच खेळाडू होते. ट्रोलर्सचं किती ऐकायचं आणि मनाला लावून घ्यायचं याला मर्यादा असतात.'