Jui Gadkari : इच्छा तिथे मार्ग... या म्हणीचा अनुभव नुकताच घेतलाय ठरलं तर मग मालिकेतील सर्वांची लाडकी सायली अर्थातच अभिनेत्री जुई गडकरीने (Jui Gadkari). जुईची 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. जुईच्या सहजसुंदर अभिनयाने संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. सायली या व्यक्तिरेखेवर जुईचंही मनापासून प्रेम आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच जुईने शूटिंगमधून काही दिवसांचा ब्रेक घेतला. कारण एका छोट्या अपघातामुळे तिच्या कानाला दुखापत झाली होती. 


औषधोपचार घेऊन बरं वाटेल असं सुरुवातीला जुईला वाटलं मात्र हे दुखणं दिवसागणिक वाढत गेलं. डॉक्टरांकडे पुन्हा तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियेचा पर्याय सुचवण्यात आला. जुईसाठी हा काळ अत्यंत कठीण आणि कसोटीचा होता. मालिकेत प्रतिमाच्या एण्ट्रीनंतर सायली आणि प्रतिमाचे अनेक भावनिक प्रसंग सुरु आहेत. 


संपूर्ण टीमने दिला जुईला धीर


जुईने एका इमोशनल सीनसाठी अंगाई देखील गायली. कानाच्या पडद्याला इजा झाल्यामुळे आवाजातले चढ-उतार कळत नव्हते. मात्र मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले आणि संपूर्ण टीमने जुईला धीर दिला आणि जुईने खूप उत्तमरित्या हे सीन साकारले. शस्त्रक्रियेसाठी आठवडाभराची रजा गरजेची होती. जुईने शूटिंग संपवून मगच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. जुईच्या सीन्सना प्राधान्य देऊन शूटिंगची आखणी केली गेली.


जुईने मानले मालिकेच्या टीमचे आभार


 यासाठी जुईने स्टार प्रवाह वाहिनी, सहकलाकार आणि ठरलं तर मगच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. बाप्पाचा आशीर्वाद आणि संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळेच मी हे करु शकले असं जुई गडकरी म्हणाली. ठरलं तर मग आणि सायलीवर असंच प्रेम करत रहा अशी मागणीही तिने प्रेक्षकांना केली आहे.    


ठरलं तर मग मालिका रंजक वळणार 


सध्या ठरलं तर मग मालिका ही रंजक वळणावर असून सायली प्रतिमाला घरी घेऊन आलीये. तेव्हापासून प्रिया आणि नागराज डाव बऱ्याचदा फसतोय. इतकच नव्हे तर प्रिया माझी मुलगी नसल्याचं प्रतिमा स्वत: सायलीला  सांगते. तसेच प्रियाच्याही बोलण्यावरुन ती तन्वी किल्लेदार नसल्याचा संशय अर्जुनला येतो. पण सायली या गोष्टीला विरोध करते. त्यामुळे आता प्रिया तन्वी नसल्याचं सत्य हे सगळ्यांसमोर कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.    


ही बातमी वाचा : 


Pushkar Jog : 'महाराष्ट्र हा बॉलिवूडचा गड...', पुष्कर जोगची पोस्ट चर्चेत, मराठी प्रेक्षकांवरही व्यक्त केली नाराजी