आगामी 'फोर्स 2' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जॉन 'कॉमेडी नाईट्स बचाओ ताजा'च्या सेटवर गेला होता. जॉनसोबत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाही उपस्थित होती. यावेळी कृष्णाने 'पाप' सिनेमाची उडवलेली खिल्ली जॉनला सहन झाली नाही, आणि तो नाराज होऊन निघून गेल्याचं सांगितलं जातं.
'जॉन आणि मी एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतो. माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी खूप खिन्न झालेलो, मात्र जॉन हा एकमेव अभिनेता आहे, ज्याने त्या काळातही मला पाठिंबा दिला. मात्र त्याला दुखावल्यामुळे मलाही खूप त्रास होत आहे' असं 'कॉमेडी नाईट्स बचाओ ताजा'चा सूत्रसंचालक कृष्णा म्हणतो.
'मी त्याच्या काही जुन्या चित्रपटांची टेर उडवली. यावेळी पाप सिनेमाचीही मी गंमत केली. त्यावर जॉनने तो आपला आवडता सिनेमा असल्याचं सांगितलं. त्यानंतर जॉन बहुदा मनोमन दुखावला गेला असावा. त्याने सोनाक्षी आणि माझ्यासोबत डान्स करायलाही नकार दिला आणि निघून गेला' असंही कृष्णाने सांगितलं.
'मी त्याला थांबवण्यासाठी त्याच्या मागे गेलो. पण तो निघून गेला. मला त्याची माफी मागायची आहे. मला त्या दिवसापासून झोप लागलेली नाही. जॉन शोमध्ये यायला तयार असल्याचं समजताच मी मनालीत सुरु असलेलं माझ्या सिनेमाचं शूटिंग मध्येच सोडून खास त्याच्यासाठी इथे आलो होतो. तो मला माफ करेल, असं वाटतं' अशी आशा कृष्णाने व्यक्त केली आहे.
'कॉमेडी नाईट्स..' मध्ये काळ्या रंगावरुन खिल्ली, तनिष्ठाचा संताप
यापूर्वी 'पार्च्ड' सिनेमात झळकलेली अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जीच्या वर्णावरुनही याच शोमध्ये टिपणी करण्यात आली होती. त्यावर तिने जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर कृष्णा आणि कलर्स वाहिनीच्या वतीने तिची माफी मागण्यात आली.