Jivachi Hotiya Kahili : प्रेक्षकांना सध्या भक्ती, शौर्य, हास्य, थरार, श्रृंगार अशा सगळ्या प्रकारांत मोडणाऱ्या मालिका बघायला मिळत आहेत. आता 18 जुलैपासून प्रेक्षकांना एक नवीकोरी प्रेमकहाणी बघायला मिळणार आहे. 'जिवाची होतिया काहिली' (Jivachi Hotiya Kahili) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


'जिवाची होतिया काहिली' या मालिकेत मराठी आणि कानडी यांच्या प्रेमाची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत  प्रेक्षकांचा लाडका, कोल्हापूरचा रांगडा गडी अभिनेता राज हंचनाळे आणि प्रतीक्षा शिवणकर मुख्य भूमिकेत आहेत. दोघेही या मालिकेच्या माध्यमातून मालिका विश्वात पदार्पण करत आहेत. 


कोल्हापुरी भाषेवरचा कानडी तडका


'जिवाची होतिया काहिली' असं मालिकेचं नाव असून मराठी आणि कानडी भाषांचा मिलाप यात होणार आहे. राज अस्सल कोल्हापुरी मुलाची तर प्रतीक्षा कानडी मुलीची भूमिका साकारणार आहे. मालिकेची झलक प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. प्रेमाला भाषा नसते हे प्रेक्षकांना या मालिकेत दिसणार आहे. 


विद्याधर जोशी आणि अतुल काळे मालिकेत नायक-नायिकेच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहेत. विद्याधर आणि अतुल हे या मालिकेचे आकर्षण ठरत आहेत. हे दोन्ही दिग्गज कलाकार एका नव्या भूमिकेत, नव्या वेशात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. विद्याधर जोशी हे अस्सल कोल्हापुरी वेशात तर अतुल काळे यांचा कर्नाटकी पोशाख प्रेक्षकांना आवडतो आहे.






कन्नड आणि मराठी कुटुंबं एकाच घरात, एकाच छताखाली कसे राहणार, हा चर्चेचा विषय ठरला आहे आणि त्यातही त्यांच्यात होणारं भांडण आणि घरातल्या घरातच मारली जाणारी सीमारेषा प्रेक्षकांना आवाक करते आहे. मराठी मालिकेत कानडी तडका पहिल्यांदाच बघायला मिळत असल्याने ही प्रेमकहाणी कोणतं नवं वळण घेणार, ही उत्सुकतेची बाब ठरणार आहे. प्रतीक्षाने साकारलेली कर्नाटकी मुलगी, विद्याधर जोशी आणि अतुल काळे या जोडगोळीचं ऑन स्क्रीन भांडण, आणि भाषेपलीकडचं प्रेम अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांचं चांगलचं मनोरंजन करणार आहेत. 


जिवाची होतिया काहिली
कुठे पाहायला मिळेल? सोनी मराठी
किती वाजता? सोम.-शनि. संध्या. 7:30 वा. 


संबंधित बातम्या


Sukh Mhanje Nakki Kay Asta : जयदीप शिर्के-पाटलांचा मुलगा नाही! ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेत येणार मोठं वादळ!


Sharad Ponkshe : शरद पोंक्षेंची नवी पोस्ट; म्हणाले, 'हिंदूंनो जागे व्हा'