मुंबई : लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली 'झी मराठी'वरील 'जय मल्हार' ही मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र ही मालिका आता हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे. 'झी'च्या हिंदी वाहिनीवर खंडेराया-म्हाळसा आणि बानूचं दर्शन घडणार आहे.

मूळ मराठी मालिकेचं हिंदीत डबिंग केलं जाणार आहे. अमराठी प्रेक्षकांपर्यंत खंडेरायांची महती पोहचवण्यासाठी हा प्रयत्न केला जाणार आहे. हिंदीत डब होणारी जय मल्हार ही पहिलीच मराठी पौराणिक मालिका असेल. मराठीतील भव्यता आता देशभरातील प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

खंडेराय, म्हाळसा, बानू यांच्या व्यक्तिरेखांना हिंदीत आवाज देण्यासाठी व्हॉइस आर्टिस्ट्स निवडण्यात आले आहेत. दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली होती. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा केसकर यांच्या मालिकेत मुख्य भूमिका होत्या.

मे 2014 मध्ये सुरु झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला होता. जवळपास तीन वर्षी टीआरपीमध्ये अव्वल राहिलेल्या या मालिकेने एप्रिल 2017 मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला.

व्हीएफएक्स पद्धतीने खंडेरायाच्या कथेला नवा साज आणि भव्यता देण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर झालेली ही मराठीतील पहिलीच मालिका ठरली होती.