Jahnavi Killekar : कलर्स मराठी वाहिनीवर आलेल्या 'भाग्य दिले तू मला' या मालिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) ही सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे. जान्हवीने तिच्या पेणच्या घरात चोरी झाली असल्याची माहिती तिने तिच्या सोशल मीडियावरुन दिली आहे. त्यातच ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सगळ्यात आधी कळाली. ते पाहून तिच्या आईला पॅरालिसीसचा झटका आला. त्यामुळे सध्या ही अभिनेत्रीने वैयक्तिक आयुष्यात एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहे.
या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने या सगळ्या घटनांची माहिती दिली. तिच्या या व्हिडीओला कॅप्शन देत तिने म्हटलं की, 'आपण सर्वांनी सतर्क व जागरूक राहण्याची गरज आहे. हा व्हिडिओ नक्की बघा आणि शेअर करा.' जान्हवीच्या घरातल्या अनेक मौल्यवान गोष्टी चोरी गेल्या आहेत. या सगळ्याचा तपासही सध्या पेण पोलीस करत आहेत.
जान्हवीने व्हिडीओमध्ये काय म्हटलं?
जान्हवीने तिच्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, 'नमस्कार, मी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर. आज व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की, तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल की माझं पेणमध्ये एक घर आहे. छोटासा बंगला आम्ही तिथे बांधलाय. पण ते आमचं विकेंड होम आहे. फक्त शनिवार रविवार आम्ही तिकडे जातो. पण नुकतच माझ्या त्या पेणच्या घरात चोरी झाली आहे. चोरांनी बऱ्याचश्या मौल्यवान वस्तू चोरल्या आहेत. जश्या की, आमच्या घरातले सगळे स्पीकर्स, माझ्या भावाची गिटार, माझ्या भावाचे वॉचचे कलेक्शन्स होते, हे सगळं चोरी गेलंय. आईच्या बराचश्या साड्या चोरीला गेल्या आहेत. चोरांना ज्या गोष्टी शक्य झाल्या, ते त्यांनी नेलं. एसी काढण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, पण कदाचित ते त्यांना जमलं नाही. फ्रिजही हलवण्याचा प्रयत्न केला गेलाय. काही गोष्टी त्यांना न्यायला जमल्या नसतील कदाचित, म्हणून त्यांनी नेल्या नाहीत.'
पुढे तिने म्हटलं की, 'व्हिडीओ बनवण्याचं कारण असं की, तुमचंही असं एखादं बंद घर असेल, वीकेंड होम असेल, तर प्लीज काळजी घ्या. कारण चोरांचा अगदी सुळसुळाट झाला आहे. म्हणजे मला असं वाटतं की, ते अगदीच नजर ठेवून असतात. या घरी कोण किती वाजता येतं, कोण असतं. या सगळ्या गोष्टींवर ते लक्ष ठेवतात आणि व्यवस्थित वेळ साधून ते चोरी करुन जातात. आपण खूप आवडीने काही गोष्टी घेतलेल्या असतात आणि अचानक असं सगळं झाल्यावर त्या गोष्टीचा धक्का बसतो. नक्की कोणत्या दिवशी चोरी झालीये हे आम्हालाही माहित नाही. गेल्या शनिवारी जेव्हा आई-बाबा गेले होते, तेव्हा हा सगळा प्रकार आम्हाला समजला. पण माझ्या आईला या सगळ्या गोष्टींचा धक्का बसला आणि तिला पॅरालिसीसचा अटॅक आला. अजूनही ती रुग्णालयातच आहे. म्हणून तुमचंही असं बाहेर कुठे घर असेल तर काळजी घ्या.'