'इशकबाज' मालिकेचे निर्माते संजय बैरागी यांची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2018 11:11 AM (IST)
वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे निराश असल्याचं संजय बैरागी यांच्या सुसाईड नोटवरुन स्पष्ट होत आहे.
मुंबई : टीव्ही मालिकांचे निर्माते आणि कला दिग्दर्शक संजय बैरागी यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील इमारतीच्या सोळाव्या मजल्यावरुन उडी मारुन 40 वर्षीय बैरागी यांनी आयुष्य संपवलं. संजय बैरागी हे 'इशकबाज' या स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेचे सुपरवाईजिंग प्रोड्युसर होते. मुंबईतील मालवणी भागातल्या जनकल्याण नगरमधील सिलिकॉन व्हॅली इमारतीच्या 16 व्या मजल्यावरुन बैरागींनी उडी मारली. वैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे ते निराश होते, असं त्यांच्या सुसाईड नोटवरुन स्पष्ट होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. संजय बैरागींचा तोल जाऊन पडल्यामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त केला जात होता. मात्र राहत्या घरी सापडलेल्या सुसाईड नोटमुळे ही आत्महत्या असल्याचं समोर आलं. शुक्रवारी संजय बैरागींनी कुटुंबीय आणि मित्रांसोबत धुलिवंदन साजरा केला. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास ते घरी परतले. इतकंच नाही, तर त्यांनी सोशल मीडियावर फोटोही अपलोड केले. त्यानंतर हे टोकाचं पाऊल उचलल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.