मुंबई : कलर्स वाहिनीवरील बिग बॉसचा 11 वा सिझन संपला, तरीही उपविजेती हीना खान चर्चेत आहे. हीना बॉयफ्रेण्ड रॉकीसोबत विवाहबंधनात अडकण्याची चिन्हं आहेत.

'लग्न करण्याचा विचार तर आहे, मात्र काही वर्षांनी' असं हीनाने एका मुलाखतीत सांगितलं. मात्र रॉकीचं नाव घेणं हीनाने टाळलं. त्यामुळे हीना आपल्या नात्याला आणखी काही वेळ देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे, हीना आणि रॉकी 'नच बलिए' या सेलिब्रेटी कपल्सच्या डान्स रिअॅलिटी शोमध्ये झळकणार असल्याची चर्चा होती. ऑफर आल्यास आपण नक्कीच हा शो करु, असं हीना म्हणाली होती.

स्टार प्लस वाहिनीवरील 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेतील अक्षरा बहूच्या व्यक्तिरेखेमुळे हीना खान घराघरात लोकप्रिय झाली होती.

बिग बॉस 11 ची विजेती शिल्पा शिंदे आणि हीना खान यांच्यातील मतभेद प्रेक्षकांना पाहायला मिळाले. शिल्पाने हीनाचं तोंडही पाहण्यास नकार दिला असताना हीनाने मात्र शिल्पासोबत काम करण्याची तयारी दाखवली. हीना लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बिग बॉसचं 11 वं पर्व सुरु झालं तेव्हा हीना खान विजेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. हीनाला तगडं फॅन फॉलोइंग होतं, मात्र काही काळाने तिची निगेटिव्ह इमेज तयार झाली आणि शिल्पा शिंदेला याचा फायदा झाला.