Isha Keskar : गेल्या काही दिवसांत विविध विषयांवर भाष्य करणाऱ्या वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Laxmichya Paulanni) ही नवी मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या माध्यमातून इशा केसकर (Isha Keskar) दमदार कमबॅक करणार आहे. 'माझ्या नवऱ्याची बायको'नंतर छोट्या पडद्या गाजवायला इशा सज्ज आहे.


मनोरंजनाच्या या प्रवाहात लवकरच एक नवी मालिका सामील होणार आहे. मालिकेचं नाव आहे लक्ष्मीच्या पावलांनी. सुप्रसिद्ध अभिनेत्री इशा केसकर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. कला खरे असं तिच्या भूमिकेचं नाव असून एका वेगळ्या रुपात इशा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.






'लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेसाठी इशा खूप उत्सुक आहे. या मालिकेबद्दल बोलताना इशा म्हणाली,"सध्या सगळीकडेच नवरात्रौत्सवाची धामधूम सुरु आहे. अश्या या मंगलमय वातावरणात लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेचा प्रोमो येतोय ही खूप भारावून टाकणारी गोष्ट आहे". 


कला खरेची भूमिका साकारणार इशा केसकर!


इशा पुढे म्हणाली,"लक्ष्मीच्या पावलांनी' या मालिकेत मी कला खरे ही भूमिका साकारत आहे. नावाप्रमाणेच कला एक उत्तम कलाकार आहे. तिला हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची आवड आहे. ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते. अंबाबाईच्या देवळाबाहेर कलाचं दागिन्यांचं दुकान आहे. ती स्वतःच्या हाताने सर्व पारंपारिक दागिने अगदी मनापासून बनवते. संपूर्ण कोल्हापूर शहरात तिने बनवलेले दागिने प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या कलाला गरीब-श्रीमंत असा भेद केलेला आवडत नाही. हे पात्र प्रत्येकाला आपलसं वाटेल असं आहे".


इशा म्हणते,"आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे. हेच प्रेम कला आणि आमच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय. किशोरी अंबिये माझ्या आईची भूमिका साकारत आहेत. किशोरी ताईंसोबत याआधीही काम केलं आहे. त्यामुळे सीन्स खूप छान होत आहेत. कोल्हापूरातल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी आम्ही सध्या शूट करत आहोत. मालिका सुरु होण्यापूर्वीच कोल्हापुरकरांचं भरभरुन प्रेम मिळत आहे".


'लक्ष्मीच्या पावलांनी' कधी होणार सुरू? 


'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका 20 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 20 नोव्हेंबरपासून रात्री 9.30 वाजता ही मालिका प्रेक्षक पाहू शकतात. तर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका रात्री 10 वाजता प्रेक्षकांना पाहता येईल.


संबंधित बातम्या


Sarla Ek Koti : अभिमानास्पद! 'सरला एक कोटी' सिनेमाची प्रेक्षकावर भुरळ; भारावला अन् लेकीचं नाव ठेवलं...