मुंबई : सोनी वाहिनीवरील 'सीआयडी' मालिकेच्या प्रेक्षकांना गेले काही दिवस आपल्या लाडक्या मालिकेचं दर्शन घडलेलं नाही. एसीपी प्रद्युम्न, दया, अभिजीत, साळुंके यासारख्या व्यक्तिरेखांनी गाजलेल्या सीआयडीने शॉर्ट ब्रेक घेतल्याचं वृत्त आहे.


 
सीआयडी मालिका कायमची बंद होणार असल्याच्या चर्चांना ऊत आल्यानंतर एसीपी प्रद्युम्न साकारणारे शिवाजी साटम यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. सीआयडी ऑफ एअर जाणार नसून छोटा ब्रेक घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मालिकेला शॉर्ट ब्रेक देण्याचं कारण आपल्यालाही ठाऊक नसल्याचं सांगताना साटम यांनी पुढील महिन्यात सीआयडी पुन्हा रुजू होण्याचं आश्वासन दिलं आहे. टाईम्स ऑफ
इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

 
भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात सर्वात दीर्घकाळ चाललेली मालिका अशी सीआयडी मालिकेची ख्याती आहे. मात्र सोनी वाहिनीवर 'द कपिल शर्मा शो' सुरु झाल्यानंतर सीआयडीचे नवे भाग प्रक्षेपित होत नाही आहेत. सीआयडी मालिकेला मोठा प्रेक्षकवर्ग आहे. नव्या भागांसोबत सीआयडीचे जुने भाग पाहणारा रिपीट ऑडिअन्सही मोठा आहे.

 
वेळ बदलण्याऐवजी सीआयडीला छोटा ब्रेक देण्यात आला आहे. त्यामुळे आपली फेव्हरेट मालिका बंद झाल्याची भीती अनेक प्रेक्षकांना सतावत होती. अनेकांनी त्याबाबत निर्माते आणि वाहिनीला पत्र, इमेल पाठवून विचारणा केली.

 
गेली 18 वर्ष अविरत मनोरंजन करणाऱ्या क्राईम मालिकेचं प्रक्षेपण पुढील काही कालावधीसाठी बंद राहील. 21 जानेवारी 1998 रोजी मालिकेचा पहिला भाग प्रक्षेपित झाला होता. त्यानंतर 16 एप्रिल 2016 पर्यंत 1348 एपिसोड्स टेलिकास्ट झाले आहेत.