India's Best Dancer 3 Winner Samarpan Lama : 'इंडियाज बेस्ट डान्सर 3' (India's Best Dancer 3) या लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. डान्सर समर्पण लामाने (Samarpan Lama) 'इंडियाज बेस्ट डान्सर 3'च्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. समर्पण हा पुणेकर असून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


'इंडियाज बेस्ट डान्सर 3'चा विजेता कोण होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या पर्वात समर्पण लामाने बाजी मारली आहे. समर्पणला चमकदार ट्रॉफीसह 15 लाख रुपयांची रक्कम रोख मिळाली आहे. तसेच त्याची कोरिओग्राफर भावना खंडुजाला पाच लाख रुपयांचं बक्षीस देण्यात आलं आहे. 'टॉप 5'मध्ये समर्पण लामा, अनिकेत चौहान, अंजली ममगाई, विपुल खांडपाल आणि शिवांशू सोनी या पाच स्पर्धकांचा समावेश होता. यात पुण्याच्या समर्पणने बाजी मारत विजेतेपद पटकावले. तर अंजली ममगाई फर्स्ट रनर अप आणि शिवांशू सोनी सेकंड रनर अप ठरला. 




'इंडियाज बेस्ट डान्सर 3'चं विजेतेपद पटकावल्यानंतर समर्पण म्हणाला.... (Samarpan Lama On India's Best Dancer 3) 


'इंडियाज बेस्ट डान्सर 3'चा महाअंतिम सोहळा खूपच रंगतदार ठरला. या कार्यक्रमाला 'गणपत' या सिनेमाची स्टारकास्ट टायगर श्रॉफ आणि कृती सेनन यांनी हजेरी लावली होती. या लोकप्रिय कार्यक्रमातील विजेतेपद पटकावल्यानंतर डान्सर समर्पणने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला,"इंडियाज बेस्ट डान्सर' हा कार्यक्रम मी नेहमी पाहत असे आणि या कार्यक्रमाचा आपणही भाग व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि आज हा प्रवास विजेतेपदापर्यंत येऊन पोहोचला आहे. या कार्यक्रमाचा मी विजेता होईल, असं मला कधीच वाटलं नव्हतं". 


समर्पण लामा पुढे म्हणाला,"इंडियाज बेस्ट डान्सर 3' जिंकणं हे माझ्यासाठी स्वप्नवत आहे. सर्वोत्कृष्ट 13 मध्ये निवड होणं हाच माझ्यासाठी एक विजय होता. या कार्यक्रमादरम्यान मी पराभव आणि विजय अशा दोन्ही गोष्टी अनुभवल्या. पराभवाने मला अनेक गोष्टी शिकवल्या आहेत. या प्रवासादरम्यान मला पाठिंबा देणाऱ्यांचे आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचे खूप-खूप आभार. माझा विजय त्यांचाही विजय आहे". 


'इंडियाज बेस्ट डान्सर 3'चं विजेतेपद पटकावल्यानंतर समर्पणने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. त्याने लिहिलं आहे,"माझ्या प्रियजनांनो शेवटी आपण जिंकलोच...ज्यांनी मला मत दिलं त्या प्रत्येकाचे मी आभार मानू इच्छितो". त्याच्या पोस्टवर चाहते कमेंट्स करत डान्सरचं अभिनंदन करत आहेत. 


संबंधित बातम्या


Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' च्या टीमनं 'इंडियाज बेस्ट डान्सर'मध्ये लावली हजेरी; केदार शिंदे म्हणतात,'मराठी सिनेमा जेव्हा त्यांच्या व्यासपीठावर जावून...'