Indian Idol Marathi : 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर सुरू झाला असून सोशल मीडियावरदेखील या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा होत आहे. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अल्पावधीतच आपलंस केलं आहे. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल  असल्याने कार्यक्रमाची रंगत  वाढते आहे. सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल खास पाहुण्या म्हणून लवकरच 'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार आहेत. 


सर्वोत्तम 14 स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे. या स्पर्धकांनी त्यांच्या आवाजाने आणि गाण्याने प्रेक्षकांना वेड लावले आहे. ग्रँड प्रिमिअरचा आठवडा दणक्यात झाल्यावर या आठवड्यात स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी, स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांचं कौतुक करण्यासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल खास पाहुण्या म्हणून येणार आहेत.





अनुराधा पौडवाल यांनी मराठीसह हिंदी, तमीळ, उडिया, नेपाळी भाषांतील सिनेमांत पार्श्वगायन केले आहे. 1973 साली अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातल्या एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून त्यांनी पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. तेव्हापासून आत्तापर्यंत सुमारे चार दशके चित्रपटगीते, भावगीते आणि भजने यांचे गायन ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमांतून त्या करत आहेत. 


अनुराधा पौडवाल यांच्या आवाजाने भक्तिरसात तल्लीन व्हायला होत असतं. लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या येण्यानं 'इंडियन आयडल मराठी'च्या माध्यमातून तमाम रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे. 'इंडियन आयडल' या रिअॅलिटी शोचं हे पहिलं वहिलं मराठी पर्व आहे. त्यामुळे प्रेक्षकांसह स्पर्धकांमध्येदेखील उत्सुकता दिसत आहे. 


संबंधित बातम्या


'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा', आता कानाकोपऱ्यात दुमदुमणार 'Indian Idol Marathi'चा आवाज, अजय-अतुल परीक्षकाच्या खुर्चीत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha