Ketaki Chitale : मराठी अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे केतकी चितळेला अटक करण्यात आली होती. जूनच्या अखेरीस केतकीला जामीन मिळाला, त्यानंतर आता केतकी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ठाणे जिल्हा कारागृहात नेत असताना आपला विनयभंग झाल्याचे केतकीचे म्हणणे आहे.
केतकी चितळेने नुकतीच एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये केतकीने पोलिस कोठडीदरम्यान मिळालेल्या वागणुकीचा खुलासा केला आहे. केतकी चितळे हिने नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, 'मला ते दिवस आठवतात आणि वाटते की, आपली न्याय व्यवस्थाही किती विचित्र आहे. दुसऱ्याची कविता कॉपी-पेस्ट केल्याबद्दल मला माझ्याच घरातून उचलून तुरुंगात टाकण्यात आले. ते माझे शब्द नव्हते.' भारताच्या न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अभिनेत्री म्हणाली, ‘कुठल्याही माहितीशिवाय, कोणत्याही नोटीसशिवाय आणि अटक वॉरंटशिवाय एखाद्याला अटक बेकायदेशीर नाही का? मी माझ्या पोस्टने कोणालाही टार्गेट केलेले नाही. लोकांनी माझी पोस्ट चुकीच्या पद्धतीने घेतली.’
सगळा प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडत होता!
‘पोलीस कोठडीत नेत असताना माझा विनयभंग झाला. माझ्यावर शाई फेकण्यात आली आणि मला मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थितीत माझ्यासोबत घडला. एवढेच नाही, तर माझ्यावर अंडीही फेकण्यात आली. पण कोणी काही बोलले नाही. त्यावेळी मी साडी नेसले होती, ती खेचण्यात आली. माझा पाय अडकून मी गाडीत पडले. त्यावेळी माझ्या छातीवर देखील मार लागला होता. मला मान्य आहे की, लोक नाराज आहेत. मात्र, या सगळ्यात ते एका महिलेचा विनयभंग करत होते. माझ्यासोबत असणाऱ्या पोलिसांना सुद्धा मारण्यात आलं. आणि हा प्रकार पोलीस स्टेशनच्या आवारात घडत होता’, असे केतकी म्हणाली.
केतकी चितळे प्रकरण काय?
आपल्या वादग्रस्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेनं ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी अतिशय खालच्या भाषेत 14 मे रोजी फेसबुकवर एक पोस्ट केली होती. या पोस्टवरून तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. केतकी चितळेनं ही पोस्ट करुन समाजात द्वेषाची भावना आणि तेढ निर्माण करण्याचे कृत्य केलं असून, बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीनंच केली होती. त्यानुसार कळवा पोलीस ठाण्यात केतकीविरोधात कलम 505(2), 500, 501, 153 (अ) नुसार गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी प्राथमिक पोलीस कोठडीनंतर ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला न्यायालयीन कोठडी सुनावली होती. कळवा पोलीस ठाण्यातील हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत केतकीनं उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी हा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दाखल केल्याचा दावाही केतकीनं आपल्या याचिकेतून केला होता. आता केतकी चितळेला जामीन मंजूर झाला आहे.
संबंधित बातम्या