हैदराबाद : 'इंडियाज गॉट टॅलेण्ट' या टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होण्यासाठी केलेल्या स्टंटदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. हैदराबादमध्ये ही घटना घडली.


 

कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तरुण धोकादायक फायर स्टंट करत होता. यावेळी त्याने रॉकेल तोंडात घेतलं आणि नंतर आगीवर फुंकलं. या स्टंट दरम्यान होरपळलेल्या तरुणाने रुग्णालयात प्राण सोडले.

 

मृत तरुण हैदराबादच्या ओल्ड सिटीच्या बरकस परिसरातील रहिवासी होता. ही घटना 7 एप्रिल रोजी घडली. 19 वर्षांचा मृत जलीलुद्दीन कॉलेज स्टुडंट होता. फलकनुमामध्ये खतरनाक स्टंट करताना त्याने स्वत:च्या तोंडात रॉकेल टाकलं आणि मग आगीवर फेकलं. यानंतर त्याने रॉकेल अंगावर ओतलं आणि आग लावली. मात्र तो या घटनेत गंभीर जखमी झाला.

 

जलीलुद्दीने सुरुवातीला रॉकेल तोंडत टाकलं. मग रॉकेल तोंडानेच आगीच्या लोटांवर फेकण्याचा स्टंट केला. हा स्टंट झाल्यानंतर त्याने अंगावर रॉकेल ओतून आग लावली. मात्र हा स्टंट फसला आणि तो गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला ओस्मानिया रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथे काल त्याने प्राण सोडले, अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त एम ए बरी यांनी दिली.

 

खरंतर जलीलुद्दीनला फायर स्टंट करण्याचा अनुभव नव्हता. पण त्याला एका लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमध्ये भाग घ्यायचा होता. मात्र जलीलला 'इंडियाज गॉट टॅलेण्ट'मध्ये सहभागी होण्याची इच्छा असल्याची कल्पना त्याच्या आई-वडिलांना नव्हती, असंही एम ए बरी म्हणाले.

 

पाहा व्हिडीओ