Happy Birthday Shweta Tiwari : अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हे टीव्ही विश्वाचे एक असे नाव आहे, ज्याला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी आज (4 ऑक्टोबर) आपला वाढदिवस साजरा करत आहे. श्वेता आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकली आहे. एक उत्तम कलाकार असण्यासोबतच, ती एक सशक्त स्त्री देखील आहे, हे तिने अनेकदा सिद्ध केले आहे. व्यावसायिक जीवनातील संघर्षाव्यतिरिक्त, श्वेताने तिच्या वैयक्तिक आयुष्यातही बरेच चढ-उतार पाहिले आहेत.


श्वेता तिवारीने अगदी लहान वयातच काम करायला सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी ती एका ट्रॅव्हल एजन्सीत काम करायची. या कामासाठी तिला फक्त 500 रुपये मानधन मिळायचे. मात्र, आपण अभिनेत्री व्हायचे हे स्वप्न तिने उराशी बाळगले होते. अभिनेत्री बनण्यासाठी तिने कठोर मेहनत केली अखेरीस तिच्या मेहनतीचे फळ तिला मिळाले.


'कसौटी जिंदगी की'मधून मिळाली ओळख


श्वेता तिवारीला टीव्ही मालिका 'कसौटी जिंदगी की' मधून घराघरांत ओळख मिळाली. पण, तिने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 'कलीरें' या टीव्ही मालिकेतून केली होती. या मालिकेतून तिला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. नंतर ती 'आने वाला पल' आणि 'कहीं किसी रोज' सारख्या मालिकांमध्ये झळकली. अभिनेत्रीने ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत प्रेरणाची भूमिका साकारली होती. या पात्राचे लोकांना खूप कौतुक केले होते.


टीव्हीविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री


श्वेताने वयाच्या 12 व्या वर्षी एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करायला सुरुवात केली होती. त्यातून मिळणाऱ्या 500 रुपयांमधून तिने शाळेची फी जमा केली. श्वेता फार लहान वयातच पैसे कमवू लागली होती. पगारातून मिळणाऱ्या पैशातून ती तिच्या आवडीच्या वस्तू खरेदी करायची. कधीकाळी अवघे 500 रुपये कमावणारी श्वेता ही आजघडीला टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री बनली आहे. मालिकेच्या एका एपिसोडसाठी ती सुमारे 60 ते 70 हजार रुपये मानधन घेते. अभिनेत्री श्वेता तिवारी वयाच्या 16व्या वर्षी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आली होती. वयाच्या 16व्या वर्षी  तिला एका जाहिरातीसाठी कास्ट करण्यात आले होते.


दोन लग्न करूनही जगतेय एकटी!


व्यावसायिकच नव्हे तर, श्वेता तिवारीचे वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत असते. अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी तिचा दुसरा पती अभिनव याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी अभिनवलाही अटकही केली होती. मात्र, हे खोटे असल्याचे अभिनव म्हणाला होता. सध्या श्वेता आणि अभिनव वेगळे राहत आहेत. अभिनवच्या आधी श्वेता तिवारीचे लग्न राजा चौधरीसोबत झाले होते. सुरुवातीचा काही काळ सर्व काही ठीक होते, पण नंतर दोघांमध्ये भांडणे सुरू झाली. श्वेता तिवारीने राजाविरोधात देखील कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. 14 वर्षे एकत्र राहिल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. आता श्वेता तिवारी आपल्या मुलांसोबत वेगळी राहते.


हेही वाचा :


Shweta Tiwari: हाय स्लीट गाउनमध्ये खुलले श्वेता तिवारीचे सौंदर्य, पाहा फोटो


Shweta Tiwari : '...म्हणून मी माझ्या मुलीला लग्न न करण्याचा सल्ला देते'; श्वेतानं सांगितलं कारण