नागपुरात नाट्यसंमेलन रंगतं आहे. महेश एलकुंचवार, प्रेमानंद गज्वी आदी मंडळी संमेलनाच्या केंद्रस्थानी आहेतच. पण हे संमेलन नागपुरात असल्यामुळे नितीन गडकरी या संमेलनाचे स्वागताध्यक्ष असणं स्वाभाविक होतं. नाटयसंमेलन कुठेही झालं तरी त्याला राजाश्रय असतो. तो तो स्थानिक नेता या संमेलनाची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जबाबदारी घेत असतो. पण नागपूर मात्र त्याला अपवाद ठरतंय की काय असं वाटण्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. कारण या संमेलनात कला सादर करण्यासाठी मुंबईहून गेलेल्या नाटकाच्या टीमला मात्र अवमानकारक वागणूक मिळाल्याची घटना घडली आहे. या नाटकाचं नाव आहे पुन्हा सही रे सही.

भरत जाधव यांची मुख्य भूमिका असलेल्या पुन्हा सही रे सही नाटकाचा प्रयोग संमेलनात ठेवण्यात आला होता. शुक्रवारी रात्री या नाटकाचा प्रयोग नागपुरात होता. त्यासाठी भरत जाधव विमानाने नागपुरात दाखल झाले. तर त्यांची इतर टीम आणि नेपथ्य बसने नागपुरात आलं. मुंबई ते नागपूर हा तब्बल २२ तासांचा प्रवास करून टीम प्रयोगाआधी काही तास नागपुरात पोचली. सलग २२ तास प्रवास करून थकलेल्या सहकलाकार, रंगमंच कामगार आदी मंडळींना विश्रांती अत्यावश्यक होतीच. शिवाय, रात्रीच्या प्रयोगासाठी तयार राहण्यासाठी अंघोळ-आवराआवर आवश्यक होती. ही टीम नागपुरात आल्यानंतर आयोजकांना साहजिकच फोन गेले. या फोनाफोनीत वेळ गेल्यानंतर संबंधित जागा शोधण्यासाठी तब्बल तीन तास ही बस नागपुरात फिरत राहीली. त्यानंतर आयोजकांशी संपर्क झाल्यानंतर कलाकारांना थेट थिएटरवर जाण्याचा सल्ला दिला गेला. कलाकारांनी थिएटरवरच फ्रेश व्हावं असाही सल्ला त्यांना दिला गेला. याबद्दल नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना, या नाटकातला एक कलाकार म्हणाला, 'तब्बल २२ तास प्रवास केल्यानंतर आम्ही कमालीचे थकलो होतो. साहजिकच थो़डा आराम, चहा आणि फ्रेश होणं अत्यावश्यक होतं. कारण सही हे नाटक कमालीचं जलद आहे. या नाटकासाठी खूप पळापळ असते. त्यामुळे आराम हवाच होता. एकतर काहीतरी संवादात गफलत झाली आणि आम्ही नागपुरातच फिरत राहीलो. त्यानंतर थिएटरवरच या असं आम्हाला सांगण्यात आलं. हे कमालीचं चीड आणणारं होतं. आमचे मुख्य कलाकार भरत जाधव याना आम्ही ही बाब सांगणार नव्हतोच. पण शेवटी त्यांच्या कानावर ही बाब गेलीच. त्यांनी आवर्जून आमची बाजू मांडली आणि मग आमची व्यवस्था झाली. पण त्यासाठी भरत जाधव यांना मध्ये पडावं लागलं. '

विशेष बाब अशी की भरत जाधव हे नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळात आहेत. त्यांच्याच नाटकाला असा अवमानकारक अनुभव येणं हे अत्यंत दुर्दैवी आहे असं नाट्यसंमेलनात बोललं जातं आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर भरत यांनी जातीने आपल्या टीमला मिळणाऱ्या वागणुकीकडे लक्ष दिलं. नाटक झाल्यानंतर ही टीम लगेच मुंबईच्या दिशेनं निघणार होती. त्यामुळे प्रयोगानंतर किमान सहकलाकारांना योग्य जेवण मिळेल की नाही याचीही खातरजमा भरत यांनी केली. त्यानंतर प्रयोग झाला.

..अन्यथा मीही येतो बसने
भरत जाधव नेहमीच आपल्या सहकलाकारांची काळजी घेतात. आपल्या सहकलाकारांना मिळालेल्या वागणुकीने भरत कमालीचे नाराज झाले. त्यांनी सर्व कलाकारांची सोय केलीच. पण नागपुरातल्या गैरसोयीमुळे संतापलेल्या भरत यांनी आपल्या दुसऱ्या दिवशीचं विमान तिकीट रद्द करून पुन्हा आपल्या टीमसोबतच बसने मुंबई गाठण्याची तयारी दर्शवली होती असंही कळतं.