मुंबई: कोरोनाबाधित असतानाही विलगीकरणाचे नियम न पाळल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या अभिनेत्री गौहर खानवर आता FWICE म्हणजेच सिनेकलाकारांच्या संघटनेने दोन महिन्यांची बंदी घातली आहे. कोरोनाची लागण झालेली असतानाही होम क्वॉरनटाइनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने मुंबईच्या ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये टीव्ही अभिनेत्री गौहर खान विरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. 


फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज (FWICE)ने गौहर खानच्या निष्काळजीपणावर कारवाई करत गौहरला दोन महिन्यासाठी इंडस्ट्रीतून बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. 


एबीपी नेटवर्कला मुलाखत देताना FWICE चे अध्यक्ष बी. एन. तिवारींनी सांगितलं की, "कोरोनाची लागण झालेली असूनही गौहर खानने होम क्वॉरनटाइनच्या नियमांचं उल्लंघन करणं चुकीचं आहे". 


तिवारी पुढे म्हणाले की, "गौहर खानने स्वतःला क्वारंटाईन न केल्यामुळे किती जणांना लागण झाली असेल, याचा विचारही केलेला नाही. होम क्वॉरनटाइनसाठी मुंबई महापालिकेने त्यांच्या हातावर स्टॅंप देखील मारला होता. तरीही गौहर खान घराबाहेर पडून इकडे-तिकडे फिरत होती, शूटिंगला जात होती. तिचं हे वागणं अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळेच फेडरेशनने त्यांना बॅन करण्याचा निर्णय घेतला आहे. फेडरेशनच्या सदस्य संघटना लवकरच गौहरच्या या वर्तणुकीबद्धल तिला नोटीसही पाठवणार आहेत". 


बी. एन. तिवारी म्हणाले की, आज कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तसेच कोरोना झाल्यावर मोठे कलाकार देखील सर्व नियमांचं पालन करतात. त्यामुळे गौहरने देखील या सर्व नियमांचं पालन करायला हवं होतं. 


मुंबई पोलिसांचे प्रवक्ते एस. चैतन्य यांनी सोमवारी एबीपी न्यूजला माहिती देताना सांगितलं की, कोविड-19 च्या नियमांचं उल्लंघन केल्याने आणि कोरोनाची लागण झालेली असतानाही शूटिंगला गेल्यामुळे ओशिवरा पोलिस स्टेशनमध्ये  साथरोग अधिनियम (1897) अन्वये गौहर खान विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


गौहर खान कार्यालयाकडून सोमवारी रात्री, गौहर खानची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचं सांगण्यात आलं. तसंच गौहर खान मुंबई महापालिकेला पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावाही तिच्या कार्यालयाकडून करण्यात आला.