मुंबई : मराठी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका विश्वात आपल्या अनोख्या अंदाजानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्यानं अत्यंत गोड बातमी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यानं आपण बाबा झाल्याची बातमी दिली आणि कमेंट बॉक्समध्ये सर्वांनीच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.


It`s a Boy असं लिहित आपल्या जीवनात एका नव्या पाहुण्याचं आगमन झाल्याचं म्हणत ही अतिशय गोड बातमी देणारा हा अभिनेता आहे, आरोह वेलणकर. इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आरोहनं त्याच्या पत्नीनं एका मुलाला जन्म दिल्याची माहिती दिली. याशिवाय बाळ आणि आई अगदी सुखरुप असल्याचंही सांगितलं.


सोशल मीडियाच्या माध्यमातूनही चाहत्यांना आपल्याच कुटुंबाचा एक भाग मानणाऱ्या आरोहनं ही आनंदवार्ता सांगताच फॉलोअर्स आणि सेलिब्रिटी मित्रमंडळींनी त्यांच्यासह त्याच्या कुटुंबावर शुभेच्छांचा वर्षाव केला.





आरोहची ही पोस्ट अगदी वाऱ्यासारखी पसरली, व्हायरल झाली. काही महिन्यांपूर्वीच आरोहनं त्याच्या आणि त्याच्या पत्नीच्या जीवनात एका पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागल्याचं सांगितलं होतं. ज्यानंतर त्यानं पत्नीच्या डोहाळजेवणाच्या समारंभातील फोटोही शेअर केले होते.





मालिकेचं चित्रीकरण, कामाप्रती असणारी जबाबदारी हे सारं सांभाळत आरोह त्याच्या कुटुंबालाही पुरेसा वेळ देत होता. त्याच्या सोशल मीडिया पोस्ट हेच सांगून जात होत्या. आता त्याच्या याच आनंदादत दुपटीनं भर पडली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सध्याच्या घडीला तो झी मराठी या वाहिनीवरील 'लाडाची लेक गं' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो.