मुंबई : वेब मीडियावर धुमाकूळ घालणारी परदेशी फँटसी सीरिज 'गेम ऑफ थ्रोन्स'च्या सातव्या सीझनचा एपिसोड लीक झाला होता. सायबर क्राईम विभागाने या प्रकरणी मुंबईतून चौघांना अटक केली आहे.


यूएसएप्रमाणे भारतात स्थानिक वेळेनुसार सोमवार, 7 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजता हा एपिसोड रीलिज होणार होता. मात्र दोन ते तीन दिवस आधीच हा एपिसोड लीक झाला होता. स्टार इंडियाचा वॉटरमार्क असलेला लोगो या व्हिडिओवर होता. त्यामुळे 'स्टार इंडिया'ने सायबर पोलिसात धाव घेतली.

तक्रारीनुसार तपास करुन पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली. 'प्राईम फोकस टेक्नॉलॉजी'ने आपल्या कर्मचाऱ्याने माजी कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे कृत्य केल्याचं स्पष्ट केलं.

अनधिकृतरित्या एपिसोड लीक करणाऱ्या चौघा आरोपींना पोलिसांनी मुंबईत बेड्या ठोकल्या. त्यांना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.