आधी नाटक बघा, मग तुमच्या इच्छेने पैसे द्या!
एबीपी माझा वेब टीम | 26 Jun 2018 12:04 PM (IST)
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मदनलाल धिंग्रा यांच्या आयुष्यावर बेतलेलं ‘चॅलेंज’ हे नाटक सध्या रसिकमनावर गारुड घालत आहे.
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर आणि मदनलाल धिंग्रा यांच्या आयुष्यावर बेतलेलं ‘चॅलेंज’ हे नाटक सध्या रसिकमनावर गारुड घालत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने या नाटकाचे ‘स्वेच्छा मूल्य’ प्रयोग सध्या सुरु आहेत. 26 फेब्रुवारीपासून ‘चॅलेंज’ या नाटकाचे जवळजवळ 32 प्रयोग झाले. दिनेश पेडणेकर आणि मुक्ता बर्वे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. या नाटकाचे काही प्रयोग ‘स्वेच्छा मूल्य’ या तत्त्वावर सादर केले जात आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची भूमिका अभिनेता निखिल राऊत याने साकारली आहे. लेखक-दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. किती गल्ला जमला? या नाटकाचा दुसरा ‘स्वेच्छा मूल्य’ प्रयोग नुकताच शिवाजी मंदिर दादरला पार पडला. या नाटकाच्या पहिल्या ‘स्वेच्छा मूल्य’ प्रयोगाने 77000 रुपयांचा गल्ला जमवला. चॅलेंज हे नाटक मिशन समजून ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं हाच या नाटकाचा मूळ उद्देश आहे. या नाटकाच्या दुसऱ्या ‘स्वेच्छा मूल्य’प्रयोगाने 50000 तर तिसऱ्या प्रयोगाने 60000 चा गल्ला जमवला. या नाटकाला नाट्यप्रेमी भरभरुन प्रतिसाद देत आहेत आणि सढळ हाताने ‘स्वेच्छा मूल्य’ प्रयोगाला प्रतिसाद देत आहेत. उत्तम कलाकृतीला चांगला रसिकवर्ग कायमच उचलून धरतो हे ‘स्वेच्छा मूल्य’ नं सिद्ध होतंय असं म्हणायला हरकत नाही.