मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतला 'हँडसम हंक' अशी ख्याती असलेला अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच छोट्या पडद्यावर झळकणार आहे. गश्मीर 'स्टार प्रवाह' वाहिनीवर एक अनोखा कार्यक्रम घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
गश्मीरचं छोट्या पडद्यावरचं पदार्पण दिमाखदार असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात आजवर कोणत्याही कलाकाराचं अशाप्रकारे पदार्पण झालं नसल्याचा दावा 'स्टार प्रवाह'ने केला आहे. त्यामुळे या नव्या कार्यक्रमाविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
गश्मीर हा ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे. रवींद्र महाजनींनी आराम हराम आहे, मुंबईचा फौजदार, झुंज, कळत नकळत यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.
2010 मध्ये गश्मीरने 'मुस्कुराके देख जरा' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 'कॅरी ऑन मराठा' चित्रपटातून 2015 त्याने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. त्यानंतर देऊळ बंद, कान्हा, वन वे तिकीट, मला काहीच प्रॉब्लेम नाही यासारखे गश्मीरचे चित्रपट गाजले आहेत.
स्टार प्रवाह आणि गश्मीर महाजनी एकत्र येऊन एक नवा आणि वेगळा कार्यक्रम प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. आजवर मराठी टेलिव्हिजनवर कधीच न झालेला प्रयोग या नव्या कार्यक्रमातून केला जाणार आहे. हा कार्यक्रम नेमका काय आहे, गश्मीरचं त्यात काय योगदान आहे अशा सगळ्या प्रश्नांची लवकरच उत्तरं मिळणार आहेत.