विशेष म्हणजे बिग बॉसचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनीही आपल्याला शरम वाटत असल्याचं ट्वीट केलं आहे. हे ट्वीट बिग बॉस संपल्यानंतर म्हणजे ठीक रात्री 11 वाजता करण्यात आलं आहे. त्यामुळे मांजरेकरांनी नंदकिशोरच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.
बिग बॉसने नंदकिशोरला बहाल केलेल्या हुकूमशाहाच्या पदामुळे त्याला विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. मंगळवारच्या भागात बिग बॉसने 'हुकूमशाह' हे साप्ताहिक कार्य स्पर्धकांना दिलं आहे. यामध्ये नंदकिशोर हुकूमशाह आहे, तर इतर सर्व स्पर्धक त्याची जनता आहेत. हुकूमशाह देईल तो आदेश मान्य करणं जनतेला क्रमप्राप्त आहे.
हुकूमशाहासाठी जनतेने 'नंदकिशोर सर्व शक्तिमान, तुमच्यासमोर झुकवतो मान' हा जयघोषही तयार केला आहे. सर्व स्पर्धकांना गुडघे टेकून त्याच्यासमोर बसावं लागतं, आणि त्याच्या आदेशाचं पालन करावं लागतं. नंदकिशोरने आस्ताद काळेला आपला रक्षक नेमला आहे, तर स्मिता गोंदकरसुद्धा त्याची सेविका आहे.
हुकूमशाहाच्या नाड्या हातात येताच नंदकिशोरने अनेक फर्मान सोडले. खरं तर टास्क सुरु होण्यापूर्वीच नंदकिशोरने कॅमेरासमोर आगपाखड केली होती. सई लाडावलेली असून घरात राहण्यास अपात्र आहे, मेघाने सात लाख रुपयांचे कपडे खरेदी केले, पुष्करला बाहेर माठ अॅक्टर म्हटलं जातं, असे आरोप त्याने केले.
आऊ म्हणजेच उषा नाडकर्णी यांची हेटाळणी करण्यावरुन पुष्कर जोग, सई लोकूर, मेघा धाडे, शर्मिष्ठा राऊत यांच्यासोबत नंदकिशोरचे खटके उडाले होते. पुष्कर आणि नंदकिशोर यांच्यामध्ये तर वारंवार वाद होत आहेत. सोमवारी झालेल्या नॉमिनेशन कार्यात सईने नंदकिशोरला नॉमिनेट केलं होतं. त्यामुळे हुकूमशाह टास्कमध्ये नंदकिशोर याचा वचपा काढणार, याची खात्री पुष्कर, मेघा, सई, शर्मिष्ठा या चौघांना होती.
नंंदकिशोरने सर्वांना आपल्यासमोर मान वाकवून अनेक वेळा स्वतःच्या नावाचा जयघोष करायला लावला, तसंच लॉनमध्ये चालता-चालता उड्या मारण्यासही भाग पाडलं. इतकंच काय, तर खाणं, पाणी पिणं आणि वॉशरुम वापरणं यासाठीही नंदकिशोरची परवानगी घ्यावी लागत आहे. प्रत्येक स्पर्धकाकडून त्यांच्या आवडीची वस्तू करस्वरुपात घेऊन त्यांना खाण्या-पिण्याची संमती दिली जात आहे. आऊंना होणारा दम्याचा त्रास आणि वयोमान यामुळे त्यांना काही बाबतीत सूट देण्यात आली आहे.
नंदकिशोरने आपले बुट काढून पॉलिश करण्याचे आदेश पुष्करला दिले. त्याचशिवाय पाय धुण्याचंही फर्मान सोडलं. सईला त्याने आपली वैयक्तिक नृत्यांगना म्हणून नेमलं, तर शर्मिष्ठाला आपले हात-पाय चेपण्याची आज्ञा सोडली. शर्मिष्ठाने परपुरुषाला हात लावण्याविषयी संकोच व्यक्त केला, त्याचप्रमाणे जॅकेट घालण्याचीही परवानगी मागितली, मात्र तिला आदेश शिरसावंद्य मानण्याचं फर्मान नंदकिशोरने सोडलं.
दुसरीकडे, घरातील सर्व स्पर्धकांचे कपडे धुण्याचे आदेश मेघाला दिले. इतक्यावरच न थांबता ते कपडे अंगावरच सुकवण्याचीही आज्ञा दिली. नंदकिशोरसाठी खास तयार करण्यात आलेल्या रुमबाहेर रात्रभर पहारा देण्याचे आदेश पुष्कर आणि रेशम यांना देण्यात आले. त्यामुळे नंदकिशोर आपल्या कंपूतील रेशमची नाराजी ओढवून घेणार का, हे पाहणंही महत्त्वाचं आहे.
बुधवारच्या भागात तर नंदकिशोरचक्क मेघाला बुटावर नाक घासायला लावलं. त्यामुळे प्रेक्षकांनी आक्षेप व्यक्त केला आहे. तर पुष्करला हात आणि मान अडकवण्याची शिक्षा बजावण्यात आली आहे. सई आणि मेघा त्याच्या सुटकेसाठी धडपडताना दिसत आहेत.
आता नऊ स्पर्धक राहिले असून ग्रँड फिनालेसाठी जेमतेम चार आठवडे उरले आहेत. आतापर्यंत आरती सोळंकी, विनित बोंडे, अनिल थत्ते, राजेश शृंगारपुरे, ऋतुजा धर्माधिकारी (वैद्यकीय कारण), जुई गडकरी, सुशांत शेलार (वैद्यकीय कारण), त्यागराज खाडिलकर (वाईल्ड कार्ड), भूषण कडू हे नऊ स्पर्धक घराबाहेर गेले आहेत. स्पर्धेच्या सुरुवातीला 15 स्पर्धक सहभागी झाले होते, तर तिघांना वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली आहे.
मेघा धाडे, सई लोकूर, पुष्कर जोग, उषा नाडकर्णी, आस्ताद काळे, रेशम टिपणीस, स्मिता गोंदकर या सात स्पर्धकांशिवाय वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेले शर्मिष्ठा राऊत, नंदकिशोर चौगुले हे दोघे जण सध्या घरात आहेत.
काही आठवड्यांपूर्वी अभिनेत्री हर्षदा खानविलकर बिग बॉसच्या घरात आली होती. मात्र ती केवळ पाहुणी म्हणून स्पर्धेत सहभागी झाली होती.
या आठवड्यात मेघा, आस्ताद, रेशम, स्मिता, शर्मिष्ठा, नंदकिशोर हे सहा स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. मात्र व्होटिंग लाईन्स बंद असल्यामुळे येत्या रविवारी कोणी स्पर्धक घराबाहेर जाणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.