नवी दिल्ली: आंतरराष्ट्रीय स्तरावर नाटकाचा सर्वात मोठा मेळा असं ज्याचं वर्णन केलं जातं ते थिएटर ऑलिम्पिक आता भारतात होणार आहे. पुढच्या वर्षी 17 फेब्रुवारी ते 18 एप्रिलदरम्यान भारतातल्या 15 शहरांमध्ये हा सोहळा पार पडेल. आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा यांनी आज ही घोषणा केली आहे.

जवळपास 50 देशातली 500 दर्जेदार नाटकं पाहण्याची संधी यानिमित्तानं नाट्यरसिकांना मिळणार आहे. प्राचीन संस्कृतीचं जनक मानल्या जाणाऱ्या ग्रीकमध्ये पहिलं थिएटर ऑलिम्पिक 1995 मध्ये पार पडलं होतं. तेव्हापासून जपान, रशिया, तुर्की, द कोरिया, चीन, पोलंड या ठिकाणी त्याचं आयोजन झालेलं आहे.

भारतात होणारं थिएटर ऑलिम्पिक हे 8वं असेल. एनएसडीचे संचालक प्रा. वामन केंद्रे, ज्येष्ठ नाटककार रतन थिय्याम यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय मंत्र्यांनी याबाबतची घोषणा केली. या भव्य नाट्यमहोत्सवाचा उद्घाटन समारंभ राजधानी दिल्लीत तर समारोप सोहळा मुंबईत पार पडेल.

उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तर समारोप राष्ट्रपतींच्या हस्ते करण्याचा सांस्कृतिक मंत्रालयाचा मनोदय आहे. वेगवेगळ्या देशातल्या नाट्यसंस्कृतीचं आदान प्रदान, देशविदेशातल्या प्रख्यात नाट्यअभिनेत्यांना भेटण्याची संधी या महोत्सवाच्या निमित्तानं उपलब्ध होणार आहे.