Maharashtrachi Hasyajatra : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम सध्या हास्यपंचमी साजरी करत आहे. आठवड्यातले पाचही दिवस हास्यरसिकांना हा कार्यक्रम पाहायला मिळतो आहे. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. 


अनेक सभांमधून, भाषणांतून जनतेची मनं जिंकणारे एकनाथ शिंदे निखळ मनोरंजनाचा आस्वाद घ्यायला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर येणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचा मुलगा डॉ. श्रीकांत शिंदेदेखील येणार आहेत. हास्याच्या मंचावर हे दिग्ग्ज खळखळून हसणार आहेत. 


अभिनेता प्रसाद ओकचा 'धर्मवीर' हा सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. लेखक प्रवीण तरडे यांच्या लिखाणाने सजलेला हा सिनेमा प्रेक्षकांना एका जुन्या आणि लोकप्रिय राजकीय नेत्यावर भाष्य करणारा आहे. लेखक, दिग्दर्शक, निर्माता प्रवीण तरडे, अभिनेता मंगेश देसाई, क्षितीश दाते आणि अभिनेत्री श्रुती मराठे हे कलाकार हास्याच्या मंचावर येणार आहेत.


'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमाच्या टीझरला, ट्रेलरला प्रेक्षकांचा उत्तम प्रतीसाद मिळाला आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरदेखील धुमाकूळ घालणार आहे. अभिनेता प्रसाद ओकने सिनेमात आनंद दिघे यांची भूमिका साकारली आहे. 'धर्मवीर' सिनेमाची टीम हास्याच्या मंचावर येणार असल्याने हास्यरसिकांसाठी ही पर्वणी ठरणार आहे. 


'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाच्या पहिल्या भागापासून हास्यजत्रेला प्रेक्षकांचं प्रेम मिळू लागलं आहे. समीर, प्रसाद, नम्रता, गौरव, वनिता आणि हास्यजत्रेतल्या इतर हास्यवीरांनी प्रेक्षकांना आपल्या विनोदांनी आणि प्रहसनांनी नवी उमेद दिली आहे. लॉकडाऊनच्या कठीण काळातही हा कार्यक्रम रसिकांचे मनोरंजन करत होता. आणि आता आठवड्यातले पाच दिवस हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करतो आहे. टेन्शनवरची उत्तम मात्रा असणाऱ्या या कार्यक्रमात हास्याचे अनेक फवारे उडत असतात. सध्या प्रत्येक भागात मोठमोठे कलाकार हास्यजत्रेच्या मंचावर  उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. अल्पावधीत केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम आठवड्यातून पाच दिवस रसिकांच्या भेटीस येत आहे. 


संबंधित बातम्या


Maharashtrachi Hasyajatra : छोट्या पडद्यावर हास्याची मेजवानी; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' आता पाच दिवस पाहता येणार


Friday Movies Release : यंदाचा वीकेंड सिनेप्रेक्षकांसाठी खास, शुक्रवारी प्रदर्शित झाले 'हे' सिनेमे


Dharmaveer : 'धर्मवीर'ने रचला विक्रम; 400 पेक्षा अधिक स्क्रीन्स आणि 10,000 हून अधिक शोज