Daar Ughad Baye : 'दार उघड बये' (Daar Ughad Baye) ही मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. येत्या 5 डिसेंबरपासून या मालिकेचा अॅक्शन पॅक आठवडा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. पुरुषी मक्तेदारीला छेद देत घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देण्यासाठी मुक्ता झटणार आहे. त्यामुळे आता या मालिकेत प्रेक्षकांना नव-नविन ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत.
मुक्ता सारंगचा गृहप्रवेश झाल्यानंतर रावसाहेब मुक्ताच्या पावलांचा ठसा असलेलं कापड जाळून टाकतात. तसेच कोंडून ठेवलेल्या सारंगच्या आईला म्हणजेच वैजयंतीला ते मुक्ताला भेटू देत नाहीत. दुसरीकडे आर्याचे आई-बाबा नगरकरांच्या घरी येतात. रावसाहेब त्यांना शब्द देतात की, आर्याचं नगरकरांची सून म्हणून या घरात दिसेल आणि तसं झालं तर मी स्वत: रावसाहेब बाईचा वेश घालून हातात बांगड्या भरून दिवसभर घरात फिरेन.
रावसाहेब मालिकेच्या आगामी भागात मुक्ता आणि सारंगसमोर प्रत्येकवेळी नविन आव्हानं उभी करणार आहेत. तसेच या आव्हानांचा मुक्ता सडेतोड सामना करताना दिसणार आहे. यात तिला तिच्या नवऱ्याची म्हणजेच सारंगची साथ मिळणार आहे.
मुक्ताने स्विकारलेल्या प्रत्येक आव्हानांमुळे कुठेतरी रावसाहेबांचा पुरुषी अहंकार दुखावला जाऊन ते अतिशय खालच्या पातळीला उतरणार आहेत. या सगळ्याचा परिणाम म्हणजे रावसाहेब स्वत:ला घरातल्यांसमोर बाईच्या वेशात हातात बांगड्या घालून फिरताना आरशात बघणार आहेत. त्यामुळे येत्या 5 डिसेंबरपासून रावसाहेब आणि मुक्तामधील खरी लढाई सुरू होणार आहे.
त्यामुळे आता मुक्ता पुरुषी मक्तेदारीला छेद देणार का? तसेच त्यासोबत घरातील स्त्रियांना सन्मान मिळवून देणार का? आव्हानांचा सामना करण्यासाठी तिला सारंगची साथ कशी मिळेल अशा अनेक गोष्टी प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहेत.
दार उघड बये
अॅक्शन पॅक आठवडा कधी होणार सुरू? 5 डिसेंबर
कधी पाहू शकतात? सोम ते शनि. रात्री 8.30 वा.
कुठे पाहू शकता? झी मराठी