मुंबई : झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेत इशाला गंडवण्यासाठी विक्रांत सरंजामे डावपेच आखत आहे. त्याचवेळी इशाची मैत्रीण रुपालीही 'राजकीय डावपेच' आखत आहे. 'तुपारे'मधील व्यक्तिरेखांच्या तोंडी चक्क 'मेक इन इंडिया'चं गुणगान गायलं जात आहे.


झी मराठीवर 'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान लोकप्रिय झाली आहे. या मालिकेत इशाची मैत्रीण रुपाली आणि मित्र बिपीन यांच्यामध्ये सोमवारच्या भागात एक संवाद रंगला होता. यामध्ये बिपीन चक्क सरकारच्या 'मेक इन इंडिया' योजनेचा आपल्याला लाभ झाल्याचं सांगत होता.

याच काळात 'भाभीजी घर पे है' मालिकेतील अंगुरी भाभीनेही नरेंद्र मोदींच्या उज्ज्वला योजनेचं प्रमोशन सुरु केलं आहे. 'तुझ से है राबता' या मालिकेत तर पैठणी विक्रेत्या आऊसा आणि कल्याणी यांनीही भाजपच्या कल्याणाचा विडाच उचलला आहे.

या प्रचाराच्या विरोधात काँग्रेसने थेट निवडणूक आयोगाचं दार ठोठावलं आहे. एखाद्या मालिकेमध्ये निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या पक्षाचा प्रचार करावा का की करु नये, याचे निकष अद्याप अस्पष्ट आहेत. पण पहिल्यांदाच आलेल्या तक्रारीवर आयोग काय निर्णय घेणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे.