मुंबई : गेल्या 20 वर्षांपासून सोनी टीव्हीवर सुरू असलेली सीआयडी मालिका बंद होणार असल्याची माहिती समोर आली होती. मालिकेत दयाची भूमिका साकारणारे दयानंद शेट्टी यांनी स्वतः याबाबतची माहिती एबीपी न्यूजला दिली आहे. मात्र याबाबत सोनी टीव्हीने अधिकृत माहिती दिली आहे.
"सीआयडी ही सोनी टीव्हीवरील सर्वात यशस्वी मालिका आहे. मालिकेने यशस्वीपणे 20 वर्षांचा प्रवास पूर्ण केला आहेत. येत्या 28 ऑक्टोबरपासून ही मालिका काही काळ ब्रेक घेणार आहे. मात्र लवकरच नव्या रुपात आणि नवनवीन केसेस घेऊन सीआयडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सीआयडीच्या आजवरच्या भागांपेक्षा नवीन पर्वातील भाग थरारक असतील", असं सोनी टीव्हीने स्पष्ट केलं आहे.
सोनी टीव्हीच्या माहितीनंतर अनेक सीआयडीच्या प्रेक्षकांना दिलासा मिळाला आहे. 20 वर्षांपासून सुरू असलेल्या या मालिकेचा आजही मोठा चाहता वर्ग आहेत.
मे 2016 मध्ये सीआयडी शो जवळपास एक महिन्यासाठी ऑफ एअर गेला होता. तर यावर्षीही जुलै ते सप्टेंबर या दोन महिन्यांसाठी हा शो सोनी टीव्हीवरुन गायब होता. सीआयडी हा शो विविध विक्रमांसाठीही ओळखला जातो. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही या शोची नोंद आहे.
संबंधित बातम्या
‘दया, कुछ तो गडबड है’, कोणतंही कारण न सांगता सीआयडी बंद होणार