Chala Hawa Yeu Dya : छोट्या पडद्यावरील अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या कथाबाह्य कार्यक्रमांमध्ये 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमाची गणना होते. मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसह बॉलिवूडकरांनादेखील या कार्यक्रमाची भूरळ पडली आहे. आता 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या आगामी भागात 'तेंडल्या' (Tendlya) या सिनेमाची टीम हजेरी लावणार आहे. 


'चला हवा येऊ द्या'मध्ये येतोय सचिन


'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या आगामी भागाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कुशल बद्रिके म्हणत आहे,"डुप्लीकेट डुप्लीकेट म्हणू नका. सचिन आहे तो सचिन...डुप्लीकेट असला म्हणून काय झालं? आला वाटतं असं म्हणत तो सचिन..सचिन म्हणत त्याचं स्वागत करतो".






डुप्लीकेट सचिनच्या रुपात भाऊ कदमची एन्ट्री होते. त्यानंतर एका सीनदरम्यान भाऊ कदमला प्रश्न विचारण्यात येतो की,"याला क्रिकेटचं काही कळतं की याने नुसतेच तसे कपडे परिधान केले आहेत. हॅट्रिक म्हणजे काय ते सांग? या प्रश्नाचं उत्तर देताना भाऊ कदम म्हणतो,"एखाद्याचं मत आपल्याला पटलं नाही तर आपण म्हणतो ना हॅ..ट्रिक..चल रे हॅट्रिक काय पण बोलतो.. तसं आहे ते". त्यानंतर त्यांना सांगण्यात येतं की सलग तीन वीकेट म्हणजे हॅट्रिक होय. त्यावर भाऊ कदम म्हणतो,"त्याला मॅट्रिक म्हणतात". त्यावर कुशल बद्रिके म्हणतो,"हो.. मॅट्रिकमध्ये सलग त्याच्या तीन वीकेट पडल्या होत्या, त्यामुळे तो असं म्हणाला". 


'तेंडल्या' विशेष भाग रंगणार


'तेंडल्या' हा मराठी सिनेमा 5 मे 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळेच सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'तेंडल्या'ची टीम 'चला हवा येऊ द्या'मध्ये हजेरी लावणार आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. रिलीजआधीच या सिनेमाला एक राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत. 


गावाकडच्या मंडळींसाठी क्रिकेट हा खेळ किती महत्त्वाचा आहे? त्यांचं या खेळावर किती प्रेम आहे? सचिन तेंडुलकर त्यांच्यासाठी कसा प्रेरणादायी आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा 'तेंडल्या' हा सिनेमा आहे. सचिन जाधव आणि नचिकेत वायकरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेप्रेमींसह क्रिकेटप्रेमी या सिनेमासाठी उत्सुक आहेत. 


संबंधित बातम्या


Tendlya : राष्ट्रीय पुरस्कार विजेता 'तेंडल्या' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; बालपणीच्या क्रिकेटच्या आठवणी जागवणारा सिनेमा