मुंबई : 'चला हवा येऊ द्या' या झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय विनोदी मालिकेला पत्र लिहून तक्रार करण्यात आली आहे. कार्यक्रमातील आगरी पात्रामुळे आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने केला आहे. आगरी-कोळी समाजाची कार्यक्रमातून जाहीर माफी मागण्यासही या संघटनेने फर्मावलं आहे.
'चला हवा येऊ द्या'च्या 5 आणि 6 नोव्हेंबर 2018 च्या कार्यक्रमातील 'दिवाळी पहाट'मध्ये विविध कवी, गायक अशी पात्रं दाखवली होती. त्यात आगरी कवी मिथुन भोईर उर्फ 'अधोक्षज' भोईरचे विनोदी पात्र दाखवले होते. मात्र आगरी समाजात हे नाव अत्यंत अभावाने आढळत असल्याचं पत्रात अॅड. भारद्वाज लक्ष्मण चौधरी यांनी म्हटलं आहे.
आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे गैर नाही. त्यासाठी आगरी बोलीभाषिक वैशिष्ट्याचा वापर करणेही चूक नाही. पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टीका टिप्पणी करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं आगरी-कोळी भूमीपुत्र संघटनेने बजावलं.
पत्रात काय?
आगरी माणूस हा भरभरुन दागिने घालतो, ती आमची परंपराच आहे, संस्कृती आहे. कोणी एक नाही तर सर्व समाजच भरभरुन दागदागिने घालतो! ते समाजाचेच वैशिष्ट्य असताना, त्यावर अशी टिप्पणी कशी केली जाऊ शकते ??? बरं, आगरी माणसाने स्व-कष्टाने रात्रन्-दिवस खपून आपल्या मीठ-शेती-रेतीतून हे मिळवले आहेत. त्याने कधी कोणाला लुटलेले नाही लुबाडलेले नाही. डाका घालायला तो काही दरोडेखोर नाही. सासऱ्याला लुबाडून-नडून, ते हुंड्यातूनसुद्धा मिळवलेले नाही.
आगरी समाज कष्ट संघर्ष, मेहनत काही करीत नाही ? सतत दारुत टाईटच असतो ? जुगार खेळून त्याच्या हाती पैसा येतो ? म्हणजे हाच त्याचा कमवण्याचा उद्योग आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
येत्या आठवडाभरात जर आपण माझ्या समाजाचे असे विकृतीकरण करुन केलेल्या सादरीकरणामुळे दुखावल्या गेलेल्या भावनांमुळे जाहीर माफी मागावी, अन्यथा आपल्या संपूर्ण टीमला माझ्या समाजाच्या भडकलेल्या भावनांना सामोरे जावे लागेल आणि त्यामुळे जर काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी आपली असेल.