मुंबई : 'कसं काय मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे,' निलेश साबळेचा हा प्रश्न आता प्रेक्षकांना ऐकायला मिळणार नाही. कारण सोमवार आणि मंगळवारी रात्री 9.30-10.30 दरम्यान प्रेक्षकांना खळखळून हसवणारा 'झी मराठी'वरील 'चला हवा येऊ द्या' हा शो निरोप घेण्याच्या तयारीत आहे.


'चला हवा येऊ द्या'चा होस्ट निलेश साबळेने स्वत: याबाबत सांगितलं. आता थोडी विश्रांती घेणार आहे, असं निलेशने सोमवारच्या एपिसोडमध्ये जाहीर केलं आणि प्रेक्षकांना धक्काच बसला.

'चला हवा येऊ द्या'मधील थुकरटवाडी, यातील श्रेया बुगडे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, सागर कारंडे, भारत गणेशपुरे आणि निलेश साबळे यांनी प्रेक्षकांना प्रचंड हसवलं. प्रेक्षकांनीही त्यांना अक्षरश: डोक्यावर घेतलं.

या शोच्या माध्यमातून मराठी चित्रपटांना, मालिकांना तसंच कलाकारांना प्रमोशनसाठी हक्काचं व्यासपीठ उपलब्ध झालं होतं.

निलेशचं खुशखुशीत अँकरिंग, भाऊ आणि कुशलची हास्याची जुगलबंदी, भारत गणेशपुरेंनी साकारलेले सरपंच, पोस्टमन काकांच्या रुपात भेटलेला सागर कारंडे प्रेक्षकांना भावला. या पुरुष कलाकारांमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवणारी श्रेया बुगडे प्रेक्षकांच्या कायमच लक्षात राहिल.

'चला हवा येऊ द्या'चं व्यासपीठ फक्त मराठीपुरतंच मर्यादित राहिलं नव्हतं. बॉलिवूड कलाकारांनाही 'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर येण्याचा मोह आवरला नाही. आमीर खान, सलमान खान, शाहरुख खान, विद्या बालन, इरफान खान, श्रीदेवी, नाना पाटेकर, सोनम कपूर, जॉन अब्राहम, वरुण धवन या कलाकारांनी शोमध्ये हजेरी लावली होती.

दरम्यान, 'चला हवा येऊ द्या'च्या जागी आता 'सारेगमप' हा नवीन शो सुरु होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

'माझा कट्टा'वर 'चला हवा येऊ द्या'ची टीम