रोमँटिक सीनच्या शूटिंगदरम्यान अभिनेत्रीच्या साडीला आग!
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2017 03:32 PM (IST)
हे दोघे वेडिंग नाईटचं चित्रीकरण करत होते. सीनमध्ये दोघे फुलं आणि मेणबत्त्यांनी सजवलेल्या बेडवर बसले होते
मुंबई : 'अॅण्ड टीव्ही' या चॅनलवरील 'अग्निफेरा' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री युक्ती कपूरच्या साडीला आग लागली. आग लागली त्यावेळी ती रोमँटिक सीन चित्रीत करत होती. युक्तीने परिपत्रक जारी करुन ही माहिती दिली. या मालिकेत युक्ती रागिनी नावाची व्यक्तिरेखा साकारत असून अंकित गेरा तिचा पती अनुरागची भूमिका साकारत आहे. हे दोघे वेडिंग नाईटचं चित्रीकरण करत होते. सीनमध्ये दोघे फुलं आणि मेणबत्त्यांनी सजवलेल्या बेडवर बसले होते. याचवेळी युक्तीच्या साडीला आग लागली. "रोमँटिक सीन माझ्यासाठी एका दु:स्वप्न ठरलं. मी अतिशय घाबरले होते. पण टीम सजग होती, त्यामुळे आम्ही या दुर्घटनेतून बचावलो," असं युक्तीने परिपत्रकात म्हटलं आहे. कोण आहे युक्ती? युक्ती जयपूरची आहे. युक्तीला एअर होस्टेस बनायचं होतं, पण नशिब तिला इथे घेऊन आलं. मालिकेत बोल्ड भूमिका साकारणारी युक्ती खऱ्या आयुष्यात फारच शांत आहे. मुंबईत राहणं हेच माझ्यासाठी बोल्डनेस असल्याचं ती म्हणते. विशेष म्हणजे ऑडिशनदरम्यान मी अनेक वेळा रिजेक्ट झाले होते, पण मी ही गोष्ट सकारात्मकदृष्ट्या घेतली, असं युक्तीने एका मुलाखतीत सांगितलं.