Bigg Boss Marathi 5 Suraj Chavan : बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण याचा महाराष्ट्राने भरभरुन प्रेम दिलं. यंदाच्या सीझनच्या सुरुवातीपासून प्रेक्षकांनी साध्या-भोळ्या सूरज चव्हाणला डोक्यावर घेतलं. याचमुळे ते बिग बॉस शोचा विजेता ठरला. बिग बॉसमध्ये गेल्यानंतर सूरजच्या चाहत्यांमध्ये मोठी वाढ झाली. बिग बॉस जिंकल्यानंतर बारामतीकर सूरज चव्हाणला अजित पवार यांनी घर बांधून देण्याची घोषणा केली. यानुसार, सध्या सूरज चव्हाणच्या घराचं काम जोरदार सुरु आहे. या कामामध्ये सूरज चव्हाण स्वत:ही मेहनत करताना दिसत आहे. घर बांधण्यासाठी सिमेंटच्या गोण्या उचलतानाचा सूरजचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. यानंतर त्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 


घर बांधण्यासाठी सूरजने स्वत:च उचलल्या सिमेंटच्या गोण्या


बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तो घर बांधण्यासाठी कामगारांसोबत सिमेंटच्या गोण्या उचलताना दिसत आहे. सूरजने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्व स्तरातून सूरजचं कौतुक होत आहे. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतरही सूरजचे पाय अजून जमिनीवरच आहेत, असं म्हणत अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.


सूरजचं नेटकऱ्यांकडून कौतुक


एका फेसबुक पेजने सूरजचा हा व्हिडीओ शेअर करत त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं आहे, "माणसाने मिळणाऱ्या यशाचा उपयोग करावा तर असा. सूरज चव्हाणने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केलं, त्याला भरपूर प्रसिद्धी मिळाली. पण मिळालेली ही प्रसिद्धी डोक्यात न जाता सूरज प्रामाणिकपणे मातीशी नाळ जोडून आहे. सुरजचं स्वप्न होतं की, आपलं स्वतःचं घर असावं आणि आता ते स्वप्न पूर्ण देखील होत आहे. त्याचं घर बांधत असताना तो जातीने त्याला जितकं शक्य होईल तितकी कामगारांना मदत देखील करत आहे. सूरज लॉरीमधून आणलेल्या सिमेंटच्या गोण्या उचलून कामगारांच्या पाठीवर देण्यास मदत करत आहे. सूरजचा हाच स्वभाव नेतकर्यांना भावला आहे. देव करो आणि लवकरच सूरजचा स्वप्नातले घर पूर्ण होवो."



मातीशी नाळ काय ठेवणाऱ्या सूरजचं महाराष्ट्राकडून कौतुक


आधी टिकटॉक आणि नंतर रिल्स बनवून सूरज चव्हाणने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. याचं टॅलेंटच्या जोरावर त्याचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. यानंतर पुढे याच टॅलेंटमुळे सूरज चव्हाणला बिग बॉससारख्या लोकप्रिय शोमध्ये जाण्याची संधी मिळाली. बिग बॉस शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील झालेल्या सूरज चव्हाणला प्रेक्षकांनी खूप सपोर्ट केला. सूरज चव्हाणला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील जनतेनं पाठिंबा देत आणि व्होट करत बिग बॉस मराठी सीझन 5 चं विजेतेपद पटकावून दिलं.


पाहा व्हिडीओ : सूरज चव्हाणने स्वत:च सिमेंटच्या गोण्या उचलल्या