मुंबई: अभिनेत्री मेघा धाडे ‘बिग बॉस मराठी’ची पहिली विजेती ठरली आहे. फायनलमध्ये अभिनेता पुष्कर जोगवर मात करत, मेघाने विजेतीपदाची ट्रॉफी उंचावली. पुष्कर जोग बिग बॉसचा उपविजेता ठरला.


मला विश्वास बसत नाही, पण मनात कुठेतरी विश्वास होता. विश्वास घेऊनच बिग बॉसच्या घरात पाऊल ठेवलं होतं, असं मेघा धाडे म्हणाली. ती एबीपी माझाशी बोलत होती.

घरात एण्ट्री केली तेव्हा दिग्गजांची 18 जणांची फौज समोर होती. मी त्यांच्यात स्वत:ला खूपच नवखी समजत होते. पण म्हटलं ठिक आहे ना यार, जेव्हा खूप इम्पॉसिबल चित्र दिसतं, तेव्हाच ते पॉसिबल करण्यात आयुष्याची मजा असते, असं मेघाने नमूद केलं.

इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो, हे आजच्या विजयावरुन पुन्हा समजलं. यावेळी मला शाहरुखचा तो डायलॉग आठवतो, “इतनी शिद्दत से मैंने तुम्हें पाने की कोशिश की है...कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है”, असं मेघाने सांगितलं.

यावेळी मेघाला विचारलं, कधी वाटलं का बिग बॉसच्या घरातून बाहेर जावं?

त्यावर मेघा म्हणाली, “मला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं हे एकाच दिवशी वाटलं. शंभर दिवसातला एक दिवस वाटलं बाहेर जावं. ज्यांच्यासाठी मी कधी कधी माझा गेम कॉम्प्रमाईज केला. माझे जीवलग मित्र –मैत्रिण पुष्कर आणि सई यांनी मला जेव्हा विश्वासघातकी बोलले, तेव्हा मी तुटले होते. ते माझे मित्र होते आणि कायम राहतील.

मी डिसलॉयल, विश्वासघाती कुणाशीच नव्हते. ना बिग बॉसशी, ना स्वत:शी, ना माझ्या मित्र मैत्रिणींशी. मी खूप प्रामाणिक खेळले. जेव्हा तुम्ही काहीही केलं नसताना आरोप ऐकायला मिळतात आणि आरोप करणारे तुमचे आपले असतात, तेव्हा खूप त्रास होतो. तेव्हा वाटलं होतं मला इथे राहायचं नाही. पण दुसऱ्या दिवशी गुड मॉर्निंग साँग लागलं आणि मी सगळं सोडून दिलं.”

मनं जिंकल्याशिवाय ट्रॉफी जिंकता येत नाही

लोक माझ्यावर प्रेम करतायेत हे जाणवत होतं. मनं जिंकायची होती. मनं जिंकल्याशिवाय ट्रॉफी जिंकता येत नाही. मी डोक्याने खेळते, मनाने खेळत नाही, असं लोक म्हणायचे. पण नाही...जर मनं जिंकाल तर ट्रॉफी जिंकाल. नुसतं डोक्याने खेळून जिंकू शकत नाही. बिग बॉस केवळ एक टास्क किंवा स्पर्धा नाही. तुम्ही माणूस म्हणून किती खरे, किती सच्चे आहात हे दिसून येतं. घरातील कॅमेरे खोटे बोलू शकत नाहीत, असं मेघाने सांगितलं.

मी राग आला तर राग दाखवला, प्रेम दाखवलं, भावनांना वाट करुन दिली, टास्कच्यावेळी ताकद दाखवली.. मी जशी आहे तशी प्रेक्षकांसमोर दाखवलं. त्या घरात पारदर्शी राहणं हे महत्त्वाचं होतं. लोक तुम्हाला ओळखतात..तुम्ही माणूस आहात, त्यामुळे तुम्ही 100 टक्के परफेक्ट असू शकत नाही. जर तसं कुणाला वाटत असेल ना तर झोल आहे. माझ्यातही काही वाईट, दुर्गुण आहेत. मला राग येतो कारण मी माणूस आहे, असं मेघाने नमूद केलं.

मी बिग बॉसच्या घरात राहून स्वत:चा प्रवास पाहिला. बिग बॉसने माझी चित्रफित दाखवली तो क्षण माझ्यासाठी खास होता. मी विनर असल्याचा आनंद त्यावेळी मला होता.


संबंधित बातम्या : 

आस्तादला सुरक्षित करुन रेशम टिपणीस 'बिग बॉस'मधून बाद 


रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार

बिग बॉस मराठी : मेघा, आस्ताद किंवा राजेश जिंकतील : अनिल थत्ते

बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती

रेशम-राजेशचं वर्तन अश्लील, नाशिकमध्ये तक्रार