मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) यंदाच्या सीझनमध्ये काही सदस्यांनी महाराष्ट्राचं मन जिंकलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धक म्हणून सामील झालेला रिल स्टार सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सूरज चव्हाणला महाराष्ट्राची जनता फुल सपोर्ट करताना दिसत आहे. अस्सल मातीतील माणूस सूरजचा साधेपणा प्रेक्षकांच्या मनाला भिडला आहे. यामुळे नेटकरी त्याला सोशल मीडियावर पाठिंबा दर्शवताना दिसत आहे. सुरुवातीला शांत असणाऱ्या सूरजला आता खेळ समजू लागला आहे. त्याचा खेळ बिग बॉस प्रेमींना आवडत आहे.


बिग बॉसच्या घरात सूरजला अश्रू अनावर


बिग बॉस मराठीचा नवा सीझन नुकताच सुरु झाला असून आता दुसरा आठवडा सुरु आहे. बिग बॉसचा खेळ 100 दिवस चालणार असून सदस्य तोपर्यंत या चक्रव्युहात अडकलेले असणार आहे. आता रक्षाबंधनचा सण काही दिवसांवर आला आहे. यानिमित्ताने बिग बॉसच्या घरात रक्षांबधन विशेष सेगमेंट पार पडलं. यावेळी बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी आपल्या भावा-बहिणींसोबतची खास आठवण सांगितली.




"बहि‍णींच्या आईप्रमाणे माया, त्यांच्यामुळे इथंपर्यंत आलो"


रक्षाबंधन निमित्तच्या खास सेगमेंटवेळी घरातील सदस्य एक-एक करुन त्यांच्या आठवणी सांगत होते. यावेळी सर्वच सदस्य भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, गुलीगत किंग सूरज चव्हाण यालाही त्याच्या बहि‍णींची आठवण आली, यामुळे त्यालाही अश्रू अनावर झाले. सूरजने यावेळी सांगितलं की, "मला पाच बहिणी आहे. बहिणी माझ्यावर आईप्रमाणे प्रेम करतात. बहिणींच्या पाठिंब्यामुळे मी पुढे आलो, त्यांच्यावर मला खूप अभिमान आणि गर्व आहे". हे बोलताना सूरज खूप भावूक झाला होता, त्याच्यासोबत घरातील इतर सदस्यांच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले.


बिग बॉस मराठीच्या घरात कल्ला न्यूज'चा सेगमेंट


बिग बॉस मराठी'च्या घरात आज 'कल्ला न्यूज'चा सेगमेंट पार पडला आहे. या कल्ला न्यूज सर्वांचच लक्ष वेधून घेतलं. 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर, गोलीगत सूरज चव्हाण आणि धनंजय पोवार हेडलाईन्स वाचताना दिसले. 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाल्यापासून अनेक बातम्या चांगल्याच गाजल्या. अश्रूंचा पूर ते प्रेमाचा गेमपर्यंत अनेक बातम्या नेटकऱ्यांनी आवडीने वाचल्या. या बातम्या सदस्यांनी वेगळ्या अंदाजात मांडल्या.