Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या नव्या सीझनचा (Bigg Boss Marathi Season 5) घरातील आठवा आठवडा सुरू झाला आहे. सोमवारी झालेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये निक्की तांबोळीसह (Nikki Tamboli) पाच सदस्य नॉमिनेट झाले आहेत. नॉमिनेट होताच निक्कीचा चेहरा पडला. निक्कीशिवाय घरातील इतर चार सदस्यही नॉमिनेट झाले. 


बिग बॉसने नॉमिनेशनसाठी 'जंगलराज' हा टास्क ठेवला होता.  'बिग बॉस मराठी'च्या घरावर या आठवड्यात जंगलराज असणार असल्याचे  बिग बॉसने सांगितले. या टास्कमध्ये शिकाऱ्याची बंदूक जास्तीत जास्त मिळवणारी टीम या कार्यात यशस्वी होणार होती. तर,  कमी गुण मिळालेली टीम या आठवड्यात घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट होणार होती.  या टास्कनुसार, टीम ए आणि टीम बीमधील प्रत्येकी एक-एक स्पर्धकांची नावे घोषित झाल्यानंतर समोर ठेवलेली बंदूक उचलून आखून दिलेल्या चौकोनात परतण्याचा टास्क असतो.  यशस्वी झालेल्या स्पर्धकाने आपल्या समोरील स्पर्धकापेक्षा आपण सरस का, याचे स्पष्टीकरण द्यायचे असते. 






टीम ए मध्ये सूरज, निक्की, अरबाज, जान्हवी आणि वर्षा यांचा समावेश करण्यात आला. तर, बी टीममध्ये  पंढरीनाथ कांबळी उर्फ पॅडीदादा, अंकिता, धनंजय, अभिजीत आणि संग्राम  यांचा समावेश करण्यात आला. पहिल्या फेरीत अंकिता-निक्की आमनेसामने येतात. त्यांच्यात निक्की बंदूक उचलते आणि तिच्या लाल चौकौनापर्यंत पोहोचते. दुसऱ्या फेरीत वर्षा आणि डीपी यांच्यामध्ये डीपीदादा बंदूक उचलतात आणि त्यांच्या बाजूच्या निळ्या चौकोनात आधी पोहोचतात. तिसऱ्या फेरीत अरबाज पॅडी यांना हरवून बंदूक उचलून घेऊन जातो. पुढील चौथ्या फेरीत अभिजीत आणि जान्हवी एकमेकांसमोर उभे ठाकतात. त्यात अभिजीतची सरशी होती. मात्र, बंदूक उचलण्याच्या नादात जान्हवीच्या पायाला दुखापत होते. ही दुखापत सहन न झाल्याने जान्हवीला रडू कोसळते. त्यामुळे तिला तातडीने मेडिकल रुममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात येते. चौथ्या फेरीनंतर दोन्ही गटांकडे दोन-दोन गुण होतात. पाचव्या निर्णायक फेरीसाठी सूरज आणि संग्राम यांच्यात सामना होतो. यात संग्राम यशस्वी ठरतो.  


बंदूक उचलण्याच्या या टास्कमध्ये विजयी झाल्याने बी टीम नॉमिनेशनपासून वाचते. तर, ए टीममधील निक्की,सूरज, अरबाज, जान्हवी आणि वर्षा या आता घराबाहेर पडण्यासाठीच्या प्रक्रियेसाठी पात्र ठरले. त्यामुळे या पाच सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार आहे.