या मालिकेमुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप केला जात आहे. निवडणूक आयोगाने या मालिकेवर दंडात्मक कारवाई करत गुन्हा दाखल करावा आणि मालिकेचे प्रक्षेपण थांबवावे अशी मागणी करण्यात आली आहे.
शिरुर लोकसभेसाठी उमेदवारी घोषित झाल्यानंतर डॉ. अमोल कोल्हे म्हणतात...
यासंदर्भात पुणे जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना विचारलं असता, यावर बंदी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सांगितलं. कारण निवडणूक आयोगाच्या नियमानुसार केवळ दूरदर्शन या सरकारी वाहिनीवरील मालिकांवरच बंदी घालता येते.
अगदी कोल्हे यांनी उमेदवारी अर्ज भरला तरी सध्याच्या नियमानुसार मालिकेवर कोणतीही कारवाई करता येणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. ही तक्रार कोणी केली, हे सांगणं मात्र त्यांनी टाळलं. डॉ. अमोल कोल्हे यांनी आयोगाकडून यासंबंधी कोणतीही विचारणा झाली नसल्याचं सांगितलं.