बिग बॉस मराठी : जुई गेमर, भूषणने इमेज बिघडवली : आरती
एबीपी माझा वेब टीम | 23 Apr 2018 11:08 PM (IST)
भाऊ मानलेल्या भूषण कडूने आपली इमेज खराब केल्याचा दावा बिग बॉसच्या घरातून पहिली एलिमिनेट झालेली सदस्य आरती सोळंकी हिने केला.
मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्या सिझनचं पहिलं एलिमिनेशन रविवारी झालं. अभिनेत्री आरती सोलंकीला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावं लागलं. घरातून बाहेर पडल्यानंतर 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत आरतीने बिग बॉसच्या घरातील सदस्यांची पोलखोल केली आहे. भाऊ मानलेल्या भूषण कडूने आपली इमेज खराब केल्याचा दावा आरतीने केला, तर जुई गडकरी गेमर असल्याचं मत तिने व्यक्त केलं. बिग बॉसच्या घरात आठवडाभर राहिले असले, तरी माझ्या मागे कोण काय बोललं, कोणाचे माझ्याबद्दल काय विचार आहेत, 24 तासांपैकी प्रेक्षकांना काय-काय दाखवलं, हे सर्व आता एपिसोड बघून समजून घेणार आहे, असं आरती म्हणाली. स्मिता आणि अनिल थत्तेंमुळे आऊट अभिनेत्री स्मिता गोंदकर आणि पत्रकार अनिल थत्ते यांनी मला पहिल्या दिवशी नॉमिनेट केलं. माझं बोलणं चीप लेव्हलचं असल्याचं सांगत थत्तेंनी मला नॉमिनेट केलं. या दोघांच्या मतांमुळेच मी एलिमिनेट झाले, असं आरती सांगते. थत्तेंविषयीचा आदर गेला अनिल थत्तेंशी मी नंतर बोलले. मी आहे तसं वागले, खरी वागले, तर तुम्हाला आवडत नाही का असा प्रश्न मी त्यांना विचारला. तुम्ही मला ज्या पातळीवर नेलंत. त्यामुळे माझ्या मनातील तुमच्याविषयीचा रिस्पेक्ट गेला. माझ्या मनात तुमच्याविषयी आदरच होता, पण मी तुम्हाला आता तुमच्यामागे पोपट बोलते, असं आरतीने त्यांना सांगितलं. तीन दिवसांनी अनिल थत्तेंनी आपली चूक मान्य केल्याचंही आरतीने सांगितलं. पहिल्या दिवसाऐवजी तीन दिवसांनी नॉमिनेशन झालं असतं, तर आपण निश्चितच तुला नॉमिनेट केलं नसतं, असं अनिल थत्ते म्हणाल्याचं आरती सोलंकीने सांगितलं. स्मिता गोंदकर दुटप्पी स्मिता गोंदकर माझी मैत्रिण आहे, ती इनोसंट असल्याचं दाखवते. पण सगळ्यांना माहित आहे की स्मिता सारखी मेकअप करत असते. ती स्वतःच्याच विश्वात असते. माझं विनोदी असणं तिला पटत नाही. ती स्वतः मला जाडू बोलते, पण मी तिला बोलले की ती शारीरिक टिपणी असल्याचा कांगावा करते, असंही आरतीने सांगितलं. केळेवाडीपासूनच भावड्या म्हणून आरतीचं अभिनेता भूषण कडूशी वेगळं नातं होतं. दोघांनी बिग बॉसच्या घरातही एकत्र प्रवेश केला. मात्र अवघ्या आठ दिवसांतच दोघांमधलं नातं बदलल्याचं पाहायला मिळालं. भूषणने गेम केला 'खरा गेम खेळला भूषण कडूने. मनोरंजन करण्यात त्याने डॉमिनन्स मिळवला. त्याने घरच्या सदस्यांच्या मनात ग्राऊंड तयार करुन ठेवलं. ते फुटेज दिसलं नसावं. पण त्याने ना मला, ना मेघाला, ना पुष्करला मनोरंजन करु दिलं.' असं आरती सांगते. भूषणला फॅन फॉलोईंग चांगलं असल्यामुळे त्याला मतं जास्त मिळाली असतील. मधल्या सहा वर्षांच्या कालावधीत मी कमी दिसले, त्यामुळे मला मतंही फारशी पडली नाहीत. मी, भूषण आणि अनिल थत्ते उरले असताना बहुतेकांनी भूषणच्या बाजुने मत दिलं. पण शेवटी जेव्हा अनिल थत्ते आणि मी उरले होते, तेव्हा थत्तेंचं नाव घ्यायचं नाही म्हणून सर्व 13 जणांनी माझं नाव घेतलं, अशी खंत आरतीने व्यक्त केली.