मुंबई : 'बिग बॉस मराठी'च्या अंतिम फेरीत स्थान मिळवणारी लोकप्रिय अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने म्हाडाच्या घरासाठी अर्ज केला आहे. ठाण्यातील बाळकुम भागात असलेल्या घरासाठी तिने कलाकार कोट्यातून अर्ज भरला.
बाळकुममध्ये कलाकार कोट्यातून केवळ दोनच घरं आहेत, मात्र या जागेसाठी तीसपेक्षा जास्त कलाकारांनी अर्ज भरला आहे. त्यामुळे म्हाडाची लॉटरी कोणाला लागणार, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.
बाळकुम भागात असलेला प्रत्येक फ्लॅट 60.06 चौरस मीटरचा आहे. या घरांची किंमत 43.45 लाख रुपये आहे. आयुष्यातील बराच काळ ठाण्यात व्यतीत केल्यामुळे आपण तिथे अर्ज केल्याचं शर्मिष्ठा म्हणते.
विशेष म्हणजे बाळकुम व्यक्तिरिक्त काही ठिकाणी घरं जास्त आणि अर्जदार कमी अशीही स्थिती आहे. कल्याणमधील शिरढोणमध्ये कलाकार कोट्यातून 38 जागा आहेत, मात्र फक्त 6 कलाकारांनी अर्ज केला आहे, तर विरारमध्ये कलाकार कोट्यात असलेल्या 74 जागांसाठी केवळ 23 अर्ज आले आहेत.
बिग बॉसच्या घराची शर्मिष्ठा स्वतःच्या घराप्रमाणे काळजी घेत होती. विजेतेपदाने हुलकावणी दिल्यामुळे पारितोषिकात असलेलं घर शर्मिष्ठाला मिळालं नाही, मात्र आता म्हाडाचं घर तिच्या नशिबात आहे का, हे पाहण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.