Bigg Boss Marathi Bhaucha Dhakka : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) यंदाच्या सीझनची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीझनचे होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) करत आहे. घरातील सदस्यांचा टास्क दरम्यान आणि त्यानंतर होणारा राडा प्रेक्षक पाहत असतात. त्याच वेळी वीकेंडला घरातील सदस्यांची भाऊचा धक्क्यावर चांगलीच कानउघडणी केली जाते. वीकेंडला होणाऱ्या भाऊचा धक्का कार्यक्रमाला प्रेक्षकांची चांगलीच पंसती मिळत आहे. नॉन फिक्शनमध्ये बिग बॉसने मराठी भाऊच्या धक्क्याचा चांगलाच बोलबाला आहे. भाऊचा धक्का कार्यक्रमाला चांगलेच रेटिंग मिळाले आहे.
महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'च्या होस्टिंगची धुरा लिलया पेलताना दिसत आहे. बॉलिवूडसह मराठी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा रितेश देशमुख 'बिग बॉस मराठी'मुळे सध्या तुफान चर्चेत आहे. त्याचं लय भारी होस्टिंग, सदस्यांची शाळा घेण्याची विशेष शैली, कमाल पॉईंट्स आणि लयभारी अदांजावर चाहते फिदा झाले आहे. 'बिग बॉस'प्रेमींकडून त्याच्या होस्टिंगचे प्रचंड कौतुक होत आहे. या सर्व गोष्टींमुळेच रितेश देशमुखचा भाऊचा धक्का हा छोट्या पडद्यावरील नॉन-फिक्शनचा राजा ठरला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाने रेकॉर्डब्रेक TVR मिळवत नवा विक्रम रचला आहे.
'बिग बॉस मराठी' या कार्यक्रमाच्या 'भाऊच्या धक्क्या'ने या आठवड्यात 4.3 TVR मिळवत सर्वच रेकॉर्ड्स ब्रेक केले आहेत. वीकेंड स्पेशल भाऊच्या धक्क्याला शनिवारी 4.0 तर रविवारच्या भागाला 4.5 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात 'बिग बॉस मराठी'ची धूम असल्याचं चित्र स्पष्ट होतं. इतर वाहिन्यांवरील नॉन फिक्शन फिक्शन कार्यक्रमांना कलर्स मराठीच्या 'बिग बॉस मराठी'ने मागे टाकलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वातील घराने, घरातील सदस्यांनी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांना चांगलीच अद्दल घडवत आहे. योग्य ती शिक्षा देत सदस्यांची दादागिरी बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच वेळी रितेश हा सदस्यांची चांगलीच कानउघडणी करत असल्याने बिग बॉस मराठी प्रमाणे 'भाऊचा धक्का' कार्यक्रमाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता असते.