Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसची या आठवड्याची थीम 'टेलिफोन' आहे. त्यामुळेच बिग बॉसच्या घरात टेलिफोनची रिंग वाजेल तेव्हा घरातील सदस्यांना नवनवीन आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे, असे बिग बॉस यांनी कालच्या भागात घोषित केले होते. काल घरात रंगले होते 'चार्ज करायचा नाय' हे नॉमिनेशन कार्य. त्यातून अक्षय वाघमारे, सुरेखा कुडची, विशाल निकम, स्नेहा वाघ, संतोष चौधरी (दादूस), तृप्ती देसाई हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत.
आज बिग बॉसच्या घरात रंगणार आहे, 'माझे मडके भरी' हे उपकार्य. या टास्कसाठी घरातील सदस्य दोन गटांत विभागले जाणार आहेत. या टास्कसाठी मिनल, विकास, सोनाली आणि आविष्कारमध्ये उमेदवारी मिळण्यासाठी चर्चा होणार आहे. मीनल सांगणार आहे,"आताच्या टास्कमध्ये कॅप्टन होण्यासाठी दोन उमेदवार निवडले जाणार आहेत. जर आपल्यातला कोणी त्यांच्या टीममध्ये गेला तर उत्कर्षसोबत डील करायची कारण त्याला डील केलेली आवडते. त्याला सांगायचं की मी शंभर टक्के तुमच्या बाजूने खेळणार फक्त पुढच्या कॅप्टनसी टास्कसाठी तुम्ही माझं नाव द्या. म्हणजे एक त्यांच्या गटातला आणि एक आपल्या. मग खरी स्पर्धा होईल. टीम A आणि टीम B मध्ये बाजी कोण मारणार? काय राडे होणार? कोणत्या टीमची मडकी फोडली जाणार? कोण कोणाशी पंगा घेणार हे आजच्या भागात दिसून येणार आहे.
बिग बॉसच्या घरात आज आनंदी आनंद असणार आहे. स्पर्धकांमध्ये सेलिब्रेशनचा मूड दिसून येणार आहे. कारण घरातील सदस्य स्नेहा वाघचा वाढदिवस असणार आहे. घरातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन स्नेहाचा वाढदिवस साजरा केला आहे. तृप्ती देसाई स्नेहाला सगळ्यांच्यावतीने छानसे गिफ्ट देताना दिसून येत आहेत. बिग बॉसच्या घरात सणासुदीला तसेच घरातील सदस्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बिग बॉसतर्फे गोड धोड पदार्थ देण्यात येत असतात. त्यामुळे स्नेहाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरातील सदस्यांनादेखील गोड धोड पदार्थ मिळणार असल्याने स्पर्धक खूश दिसून येणार आहेत.
कालच्या भागात स्नेहा आणि आविष्कार इमोशनल होऊन एकमेकांना मिठीत घेऊन रडताना दिसून आले होते. हे दोन सदस्य कधीकाळी पती-पत्नी होते. पण आता त्यांच्यात घटस्फोट झालेला आहे. पण घटस्फोटानंतर बिग बॉसच्या घरात दोघेही अचानक आमनेसामने आल्याने आता पुन्हा एकदा ते नातं पुढे घेऊन जाण्याचा विचार करू शकतात अशी शक्यता चाहत्यांकडून वर्तवली जात आहे. बिग बॉसच्या घरात स्नेहा आविष्कारला पाहून अस्वस्थ दिसली होती.